नवी दिल्ली – जगभरात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, गेल्या वर्षी जवळपास ९३.१० कोटी टन अन्न वाया जात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालातून समोर आली आहे. हा आकडा एकूण अन्नाच्या १७ टक्के आहे. भारतातल्या घरांमधून जवळपास ६.८७ कोटी टन अन्नाची नासाडी होत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमनं (यूएनईपी) तयार केलेल्या अन्नाच्या नासाडीसंदर्भातल्या २०२१ च्या अहवालानुसार, घरं, किरकोळ दुरानं, रेस्टॉरंटसह अन्नपदार्थ बनवणार्या ठिकाणी दररोज अन्नाची नासाडी होते.
त्यामध्ये ९३.१० कोटी टन अन्नापैकी ६१ टक्के भाग घरांमधून, २६ टक्के हॉटेल, १३ टक्के किरकोळ दुकानातून वाया जातो. जगात दरवर्षी प्रतिव्यक्ती १२१ किलो अन्न वाया जात आहे. प्रति घरांनुसार ७४ टक्के अन्न वाया जाते.
यूएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांच्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि नैसर्गिक साधनांच्या नुकसानाबद्दलची जबाबदारी आपल्याला समजणार नाही. त्याचे परिणाम आपल्याला एक दिवस भोगावे लागतील.
जगभरातील प्रत्येक देश आणि देशातील नागरिकांना अन्नाची नासाडी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. खाद्यपदार्थांची नासाडी करण्यात श्रीमंत देश सर्वात पुढे आहेत. संयुक्त राष्ट्र संघानं आगामी २०३० पर्यंत अन्नाची नासाडी कमी करण्याचा संकल्प केला आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये सर्वाधिक नासाडी, भारतातील परिस्थिती बरी
अहवालानुसार, भारतातील घरांमध्ये प्रति व्यक्तीच्या तुलनेत दरवर्षी ५० किलो अन्न वाया जाते. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, प्रत्येक वर्षी भारतीय घरांमध्ये ६८,७६०,१६३ टन अन्नाची नासाडी होते. अमेरिकेतील घरांमध्ये प्रति व्यक्तीच्या तुलनेत दरवर्षी ५९ किलो आणि चीनमध्ये ६४ किलो अन्न वाया जाते.
दक्षिण आशियाई देशांच्या यादीत भारत शेवटच्या पायरीवर आहे. या यादीत अफगाणिस्तान सर्वात वर आहे. तिथं ८२ किलो अन्न वाया जातं. त्यानंतर नेपाळमध्ये ७९ किलो, श्रीलंकामध्ये ७६ किलो, पाकिस्तानमध्ये ७४ किलो आणि बांगलादेशमध्ये ६५ किलो अन्नाची नासाडी होते.
एकीकडे अन्न नासाडी, दुसरीकडे भूकबळी
२०१९ मध्ये ६९ कोटी लोकांचा भूकबळीमुळे मृत्यू झाला आहे. ३०० कोटी लोकांना चांगलं पौष्टिक अन्न मिळाले नाही. नव्या अहवालानुसार, कोविड महामारीदरम्यान उपाशी राहणार्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.