नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भाषेच्या शिक्षणावर चर्चा करताना, शिक्षण आणि शालेय शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग म्हणून बहुभाषिकतेला ओळखणे आणि त्याचा प्रचार करणे यावर जोर देण्यात आला आहे. शिवाय, प्राचीन काळापासून भारतीय भाषा सहअस्तित्वात आहेत, एकमेकांना पूरक आणि समृद्ध करीत आहेत. अशा प्रकारे राष्ट्राच्या एकात्मतेला आणि सौहार्दाला हातभार लागतो. एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पना समजून घेण्याच्या प्रक्रियेत, विद्यार्थ्यांनी भाषिक विविधतेतील भारताची एकता अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे आवश्यक आहे.
या उद्देशाने, प्रादेशिक भाषांच्या वापराद्वारे भाषा शिक्षणाला चालना देण्यासाठी 28 सप्टेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत 75 दिवसीय ‘भारतीय भाषा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत स्थानिक, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मालिकेत “आपल्या परिसराची ओळख” या उपक्रमा अंतर्गत शहरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या 62 विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले आणि आपल्या मातृभाषेत ते व्यक्त केले. प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांच्या मार्गदर्शनात उज्ज्वला चांदोरकर, मुख्य अध्यापिका सुभद्रा नायर, आरीफ बेग, सागर काठोळे यांनी उपक्रमासाठी समन्वयक म्हणून परिश्रम घेतले.