श्रीकृष्ण कुलकर्णी
–
नाशिक जिल्हा आणि परिसर कांदे, द्राक्षे डाळिंबासह ताजा भाजीपाला, फुलांसाठी तर जळगाव केळीसाठी परिचित आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नाशवंत भाज्याचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना नाशिकचा परिसर तर किचन गार्डन म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरासह परराज्यात उपलब्ध व्हावा यासाठी पहिली किसान पार्सल रेल सुरु करण्यात आली आहे. ही रेल्वे उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार असून साधारणतः अडीचशे ते तीनशे टन मालाची निर्यात होईल त्यामुळे आगामी काळात आर्थिक चक्रे वेगाने फिरण्यास निश्चित मदत होणार आहेत.
नाशिकचा कांदा, द्राक्ष, डाळिंब व भाजीपाल्याला वर्षभर देशभरातून मागणी असते, अनेकदा द्राक्ष, कांद्याचा प्रश्न तर अगदी लोकसभेत, राज्यसभेत गाजल्याचे आपण पाहिले आहे. किंमतीतील चढ उतारामुळे तसेच टंचाईमुळे ग्राहकांना माल उपलब्ध व्हावा, यासाठी पाकिस्तान, इराणसारख्या देशातून सरकारने माल आयात केल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र आता भारतात तयार होणारा माल हा आपल्याच जनतेला उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मोदी सरकारने पाऊले उचलली असून इतर क्षेत्राप्रमाणेच कृषीक्षेत्रासाठी विविध योजना आखून सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.
त्वरीत माल बाजारपेठेत पोहचणार
पहिल्या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांने तयार केलेला भाजीपाला, फळे, फुले देशभरातील बाजारात पोहचवणे शक्य होत आहे. ही रेल्वे सुरु झाल्याने शेतकरी, निर्यातदारांना खूप आनंद झाला आहे. अशा मालाची निर्यात झाल्यास त्यातून आमच्या मालाला निश्चित योग्य न्याय मिळेल, असे त्यांना वाटते, शिवाय इतर ठिकाणच्या बाजारपेठेतील भाव नियंत्रणात येऊ शकतील. नाशिक,जळगाव आणि धुळे येथील काही भागात केळीच्या जोडीला पालेभाज्या, भात आणि डाळिंबाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात निघते. त्यामुळे नगदी पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात. कांदा, द्राक्ष या उत्पादित मालाच्या जलद वाहतूक आणि विक्री लायक बाजारपेठेसाठी किसान एक्सप्रेसची अनेक दिवसांपासून मागणी होती, अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने आमची स्वप्नपूर्ती झाल्याची भावना प्रगतीशील शेतकरी राजाभाऊ माळोदे, नामदेव आढाव, द्राक्ष उत्पादक शंकरराव बोराडे यांनी व्यक्त केली.
अडीचशे ते तीनशे टन माल पाठविणार
नाशवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकूलित वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागीदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्प मांडतांना केली होती. या रेल्वेने शेतकरी बांधवांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकूलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे, या किसान एक्सप्रेसला दहा पार्सल बोगी असून एक लगेज कम ब्रेक व्हॅन आहे. दहा बोग्यांमधून साधारणतः नाशिकमधून जवळपास दोनशे ते अडीचशे आणि जळगावहुन शंभर ते दिडशे टन मालाची पाठवणी करता येते. त्यातून वीस ते पंचवीस कोटीची किंबहुना त्यापेक्षा अधिक उलाढाल होऊ शकेल,असा विश्वास कांदा उत्पादक शेतकरी जयवंतराव होळकर यांनी व्यक्त केला.
३२ तासात एक हजार ५१९ कि.मी, दरही कमीच
किसान रेल ३२ तासांत एक हजार ५१९ कि.मी. अंतर धावेल. यादरम्यान नाशिकरोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बु-हानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज,पं.दिनदयाळ उपाध्याय जंक्शन आणि बक्सर या स्थानकावर थांबणार आहे. किसान एक्सप्रेसचे शुल्क पी-स्केलवर आकारले जात आहे. जे नियमित मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यापेक्षा कमी आहे. साधारण प्रतिटन नाशिक रोड-देवळाली ते दानापूर-४००१ रूपये, मनमाड ते दानापूर३,८४९, जळगाव ते दानापूर३,५१३, भुसावळ ते दानापूर ३,४५९,बुर्हानपुर ते दानापूर ३,३२३,खंडवा ते दानापूर ३,१४८ रूपये याप्रमाणे भाडे आहेत.