नाशिक – कोरोना लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद असलेली एसटी महामंडळाची सेवा आता हळूहळू सुरू होत आहे. गुरुवारपासून नांदगाव-नाशिक, येवला-नाशिक, सिन्नर-नाशिक, पिंपळगाव बसवंत-नाशिक आणि सटाणा-नाशिक या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. केवळ २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा राहणार आहे. तर, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करता येणार नाही. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन सेवेचा विस्तार केला जाईल, असे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी स्पष्ट केले आहे. तब्बल चार महिन्यांनी लालपरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी धावली आहे. सटाणा, नांदगाव व येवला येथून दररोज दोन तर सिन्नर व पिंपळगाव बसवंत येथून दररोज चार बस धावणार आहेत.