दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातील पाणी गेल्या ३१ दिवसापासून सोडण्यात आले असून धरणातील ९३ टक्के पाणी साठ्यापैकी फक्त २० टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे तालुक्यातील जनतेने विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार शासन स्तरावर झिरवाळ यांनी प्रयत्न करून धरणातील पाणी बंद विषयी चर्चा करून रविवार पाणी बंद होणार असल्याची माहिती दिली आहे.
सध्या धरणात जरी २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात पाणी किती टक्के आहे हे सांगणे कठिण झाले आहे. निफाड, येवला,मनमाड तालुक्याने करंजवण धरणातील पाणी आरक्षित केलेले असले तरी ज्या धरणासाठी स्थानिक जनतेच्या जमिनी दिल्या आहे त्यांचा त्याग लक्षात घेता त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे. यासाठी शासना स्तरावर बोलणी चालू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व धरणातील व नदीवरिल पाणी परवानग्या बंद होत्या. या संदर्भात वारवार बैठका घेवून सर्व ठिकाणची पाणी परवानगी चालू करण्यात आली आहे. यासाठी आम्ही स्वःताह तलाठया मार्फत सातबारा उतारे घेवून तसेच गावा गावा बैठका घेवून धरणातील व नदीवर सोसायटी स्थापन करणार आहे. त्यांमुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून ३५ टक्के पाणी पुणेगावसह ओझरखेड धरणात आले आहे. त्यांमुळे या धरणाना संजीवनी मिळाली आहे. सध्या मांजरपाडा प्रकल्पाचे काम चालू असून जरी हे काम या वर्षी पूर्ण झाले नाही. तरी चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून १०० टक्के पाणी हे तालुक्यात येणार असल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह चादवंड, येवला, मनमाड, निफाड तालुक्याला फायदा होणार आहे. यासाठी शासन स्तरावर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी मी व कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी मोठया प्रमाणात पाठपुरावा केला असून या प्रयत्नाना यश आले आहे. तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नामदार झिरवाळ यांनी दिली आहे.