नवी दिल्ली – उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ ची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. महामारी दरम्यान अभूतपूर्व आव्हानांच्या काळात स्टार्टअपने केलेले प्रयत्न, उपक्रम आणि दाखवलेली लवचिकता यांची दखल घेत राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ साठी अतिरिक्त श्रेणीची जोड देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख उत्पादनांच्या स्वदेशीकरणावर केंद्रित नवसंशोधनांचा गौरव करणे हा उद्देश आहे. पुरस्कारांसाठीचे अर्ज ३१ जानेवारी २०२१ पर्यंत पाठवता येतील.
स्टार्टअप्ससाठी पुरस्कार १५ विविध क्षेत्रांमध्ये वर्गीकृत ४९ विभागात देण्यात येतील. शेती, पशुसंवर्धन, पेयजल, शिक्षण आणि कौशल्य विकास, ऊर्जा, उद्योग प्रणाली, पर्यावरण, फिनटेक, खाद्य प्रक्रिया, आरोग्य आणि निरोगीपणा, उद्योग ४.०, सुरक्षा, अंतराळ, वाहतूक आणि प्रवास ही १५ क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त, ग्रामीण भागात प्रभाव , महिला उद्योजक, आयात पर्यायासाठी क्षमता, कोविड विरोधातील लढाईसाठी नवसंशोधन आणि भारतीय भाषांमध्ये आशय निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्ससाठी शैक्षणिक संस्थांकडून सहा विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच मजबूत स्टार्टअप परिसंस्थेचे मुख्य घटक म्हणून इनक्यूबेटर आणि ऍक्सिलरेटर यांना उल्लेखनीय योगदानासाठी गौरवण्यात येईल.
प्रत्येक क्षेत्रातील विजयी स्टार्टअपला प्रत्येकी ५ लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. संभाव्य प्रायोगिक प्रकल्प आणि कामाच्या ऑर्डरसाठी संबंधित सार्वजनिक प्रशासन आणि कंपन्यांसमोर उत्पादने सादर करण्याची संधी विजेते आणि दोन उपविजेत्यांना दिली जाईल. त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी प्राधान्य दिले जाईल.
एक विजेता इनक्यूबेटर आणि एक विजेता ऍक्सिलरेटर यांना प्रत्येकी १५ लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येईल.
रोजगार निर्मिती किंवा संपत्ती निर्मितीची उच्च क्षमता असलेलया आणि सामाजिक प्रभाव पाडणाऱ्या उत्कृष्ट उत्पादन किंवा सोल्यूशन्सची निर्मिती करणार्या उत्कृष्ट स्टार्टअप्स आणि परिसंस्थांना मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने डीपीआयआयटीने २०१९ मध्ये पहिला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार सुरू केला होता. एनएसएच्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याला मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादाने भारावलेल्या डीपीआयआयटी ने दुसऱ्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार २०२१ ची घोषणा केली आहे.
अर्जाच्या प्रक्रियेचा तपशील www.startupindia.gov.in वर पाहता येईल.