…..
सामन्याच्या अखेरच्या चेंडूपर्यंत निर्णयाची प्रतिक्षा करायला लावणाऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर बंगलोरचा पराभव करून विजयाचा दुष्काळ संपवला. या चित्तथरारक सामन्यात पंजाबने ८ गडी राखून विजय तर मिळवलाच परंतु त्याच बरोबर, साखळीतून बाहेर फेकले जाण्याची भीती दूर केली.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी आजचा दिवस म्हणजे ख्रिस गेलच्या आगमनाची दिवाळी ठरला. ७ सामन्यात अवघा १ विजय मिळवलेल्या पंजाबला रॉयल चॅलेंजर्स, बेंगलोर सारख्या मजबूत संघाविरुद्ध विजय मिळाल्याने ख्रिस गेलचा पायगुण लकी ठरला आहे. के.एल.राहुल आणि मयंक अग्रवाल हे सातत्याने खेळतात ते आजही खेळले. परंतु आज निर्णायक ठरल्या त्या ख्रिस गेलच्या ५० धावा. स्वतःला “युनिव्हर्स बॉस” म्हणवून घेतांना हिम्मत लागते ती हिम्मत त्याच्या पाच षटकारांमध्ये पूर्णपणे दिसून आली. जागेवरून अगदी लिलया मारलेले ५ षटकार गेलचा ट्रेडमार्क होते.
तो आला, त्याने पाहिलं आणि त्यांने जिंकलं अशाच पद्धतीचे वर्णन ख्रिस गेलच्या फलंदाजी बद्दल करता येईल. त्याआधी विराट कोहली, शिवम दुबे आणि क्रिस मॉरिस यांनी केलेल्या चांगला फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ने १७१ धावांचे आव्हान उभे केले होते.
शुक्रवारचा सामना
रडतखडत परंतु इतर काही संघापेक्षा चांगली मेहनत घेऊन पहिल्या चार संघात असलेला कोलकाता नाईट रायडर्स अबुधाबीत मुंबई इंडियन्स संघाबरोबर दोन हात करणार आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत ७ सामन्यात मिळून १३१६ धावा केल्या असून गोलंदाजी करताना विरुद्ध संघाला मात्र ११२८ धावा दिल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मात्र ७ सामन्यात १११८ धावा केल्या असून गोलंदाजी करताना विरुध्द मात्र १२१५ धावा दिल्या आहेत. थोडक्यात ही तुलना काय सांगते तर, गोलंदाजीत कमकुवत असलेला कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात गोलंदाजीत किती चांगले प्रदर्शन करतो यावर या सामन्याचे भवितव्य अवलंबून राहील.