लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. गर्भपातानंतरही दुस-या युवतीशी विवाह केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर सुभाष कोटकर (२५ रा.कल्पक सोसा.जवळ,हिरावाडी) असे संशयीताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीताने युवती अनुसूचित जाती जमातीची असल्याचे माहिती असतांना तिला लग्नाचे आमिष दाखविले. डिसेंबर २०१७ ते जून २०२० या काळात त्याने आपल्या घरात वारंवार बलात्कार केला. तसेच तिचा बळजबरीने गर्भपातही केला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयीताने दुस-याच मुलीशी लग्न केल्याचे समोर आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पंचवटी पोलीस गाठून आपबिती कथन केली असून संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी बलात्कार आणि अनूसुचित जाती जमाती अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त प्रदिप जाधव करीत आहेत.
…….
आंबेडकर कॉलनीत ५५ हजाराची घरफोडी
नाशिक : रविवार कारंजा भागातील रेडक्रॉस परिसरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भानजी गोहिल (रा.पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. रेडक्रॉस येथील आंबेडकर कॉलनीत राहणारे गोहिल कुटुंबिय ७ ते १४ आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटातील १५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
…..
तरूणावर प्राणघातक हल्ला
नाशिक : कुठलेही कारण नसतांना एकाने तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून जखमी केल्याची घटना महात्मा फुले मार्केट भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास ताब्यात घेतले आहे. नितीन पिराजी गायकवाड (१९ रा.सावित्रीबाई फुले झोपडपट्टी,वडाळागाव) असे संशयीताचे नाव आहे. या घटनेत रतन भिकाजी खांडवी (२७) हा युवक जखमी झाला असून त्याचा भाऊ मधुकर गायकवाड (रा.राकडपाडा ता.सुरगाणा) याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन खांडवी गुरूवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास महात्मा फुले मार्केट कडून त्र्यंबकनाका पोलीस चौकीकडे पायी जात असतांना ही घटना घडली. संशयीताने वाट अडवित कुठलेही कारण नसतांना रतन खांडवी याच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. या घटनेत रतनच्या डोक्यास व कानावर दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वराडे करीत आहेत.
…
वेगवेगळया अपघातात दोघे ठार
नाशिक : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गणेश अशोक रोडे (३५ रा.पिंपळद ता.निफाड) व प्रमोद दादा भालेराव (४२ रा.जीवन विहार सोसा.जयभवानी रोड) असे मृतांची नावे आहेत. गणेश रोडे यांचा गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास सिडकोतील शुभम पार्क भागात अपघात झाला होता. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते. बुधवारी (दि.१४) उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना जयभवानी रोडवरील आर्टीलरी सेंटर भागात घडली. प्रमोद भालेराव हे गुरूवारी (दि.१५) आपल्या दुचाकीवर नाशिकरोडकडून आर्टिलरी सेंटरच्या दिशेने प्रवास करीत असतांना भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात ते दुभाजकावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रक्रणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
…
जमीन व्यवहारात फसवणूक
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झाडवड शिवारातील शेतजमीन विक्रीचा घाट घालून दोघांनी शेतक-यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश पांडुरंग नागरे व सुरेखा शहा (रा. दोघे घोटी, ता.इगतपुरी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी महेश किसन वाटे (रा. खेड, ता. इगतपुरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. झाडवड ता.त्र्यंबकेश्वर येथील वंगणाचा मळा भागातील १ हेक्टर ९३ आर शेतजमीनीचा संशयीतांनी वाटे यांच्या सोबत व्यवहार केला होता. या व्यवहारात एक लाखाचे टोकन घेण्यात आले होते. व्यवहार पूर्ण न करताच फसवणुक करण्याच्या हेतून संशयीतांनी जमिन सुरेखा साठे यांच्या नावे साठेखत केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिरी करीत आहेत.
……
वृद्ध महिलेची आत्महत्या
नाशिक : ६५ वर्षीय वृध्द महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आडगाव शिवारातील साठे मळा भागात उघडकीस आली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रभागाबाई शिवराम धोंडगे (६५, रा. धोंडगेमळा, आडगाव) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धोंडगे यांचा मृतदेह गुरूवारी (दि.१५) शिवाजी साठे यांच्या मालकीच्या विहिरीत पाण्यात तरंगताना मिळून आला. साठे यांचा शेतगडी सकाळच्या सुमारास विहीरीवर गेला असता ही घटना उघडकीस आली. वृध्देने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.