नाशिक जिल्ह्यातील ४८९ ग्रामपंचायतीच्या भेटीतून १८ हजार ११२ कुटुंबाचे सर्वेक्षण
नाशिक : कोरोना संकटकाळात बार्टीने स्मार्ट वर्कच्या माध्यमातून समतादूतांमार्फत विविध माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनुसूचित जातीं मधील काही जाती लुप्त स्वरूपात आहे, त्या सामाजिक अथवा शासकीय प्रवाहात नाहीत, काही जाती पारंपारिक पद्धतीचे व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करुन जगत आहेत, अशा गावपाळतीवर ५९ अनुसूचीत जातींचे सर्वेक्षण समतादूतांमार्फत सुरु केले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ४८९ ग्रामपंचायतींना भेटी, ऑनलाईन संपर्क करुन, व्हाट्सॲपच्या माध्यमातून १८ हजार ११२ कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे समतादूत प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात प्रकल्प अधिकारी श्रीमती दाभाडे म्हणतात, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टी, पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जातीं मधील सामाजिक अथवा शासकीय कोणत्याही प्रवाहात नसलेल्या घटकांची नोंद व्हावी, त्यांचीही प्रगती व्हावी, शासनाचे सर्व लाभ त्यांना मिळावे आणि त्यांचा त्रिस्तरीय दर्जा उंचवावा हा मुख्य उद्देश ठेवून ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी यांच्या मदतीने माहिती संकलनाचे काम समतादूत यांच्यामार्फत करण्यात येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असतांना देखिल समतादूत विविध उपक्रमांतर्गत प्रशासनास मदत व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करत आहेत. समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राज्य घटनेचे मुलतत्व न्याय, स्वातंत्र, समता, बंधुता या विषयावर प्रबोधन करून समतादूतांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जनसामान्यांच्या मनात आपली एक वेगळीच ओळख तयार केली आहे. सामाजिक सलोखा, बंधूभाव निर्माण करणे, जातीय दुर्भावनांचा विध्वंस करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करणे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क अधिकार संविधानाने दिलेले असून त्याबद्दल दुर्लक्षित घटकांना सन्मान व न्याय देणे, थोर संत, समाज सुधारकांचे विचार जनमाणसात पोहचविणे, गावात, शहरात, ग्रामपंचायत, नगरपरिषद, शासकीय अशासकीय संस्था, शाळा कार्यालये, महाविद्यालये इ. ठिकाणी समता, बंधुता, सामाजिक न्याय व विविध सामाजिक उपक्रम समतादूतांमार्फत राबविले जात असल्याचेही प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका समतादूतांनी तालुक्यातील प्रशासनास मदत व सहकार्य करत आहेत त्याअंतर्गत कोरोनाच्या काळात स्वत:ची काळजी घेत तालुकास्तरावर समतादूतांमार्फत कोरोना आजाराबद्दलची जनजागृती, गरीब गरजू लोकांसाठी रेशन वाटप, रूग्णांसाठी सहकार्य, शासकीय रेशन वाटप दुकानाबाहेर गर्दी होवू नये याकरीता सोशल डिस्टस्टिंग पाळण्याची माहिती देण्यासाठी समतादूतांची मदत होत आहे. कोरोनाकाळात परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी प्रशासनाची सर्व मदत यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम या समतादूतांमार्फत करण्यात आले आहे. कोरोनाबद्दलचे भितीचे वातावरण घालवण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी समतादूत मदत करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समतादूतांनी कोरोना काळात आपल्या तालुक्यातील प्रशासनास सहकार्य करून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर अनुसूचीत जातीच्या सर्वेक्षणाचे काम उत्तमरित्या सुरु असून या सर्वेक्षणातून शासनास लाभार्थी वर्ग मिळवून देण्यास अधिकच सोपे झाले असल्याचेही प्रकल्प अधिकारी श्रीमती दाभाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. याबरोबरच बार्टीमार्फत स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास यासारखे विविध ऑनलाईन क्लासेस राबवित आहे. बार्टीच्या या स्मार्टवर्कचा विद्यार्थ्यांना तसेच बेरोजगारांना निश्चितच फायदा होणार आहे, या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी केले आहे.