पिंपळनेर, ता. साक्री – शांताई एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षकांमुळे ईदगाव पाडा येथील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असून शिक्षकांनी थेट गाव गाठत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे धडे देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोविड-१९ मुळे राज्यातील सर्वच शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून “शाळा बंद, शिक्षण चालू.” हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत शांताई एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी स्थित गाव-पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देत आहेत. ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेला स्मार्टफोन नसल्याने त्यांचे या प्रक्रियेतून शैक्षणिक नुकसान होऊ नये हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून थेट त्यांच्या घरापर्यंत पर्यंत पोहचून अशा विद्यार्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व बाबींची खबरदारी घेऊन अध्यापन करीत आहेत. यासोबतच ऑनलाईन अध्यापन,ठराविक कालावधीसाठी त्यांना गृहपाठ देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती करत आहेत.
शाळेतील शिक्षकांनी शाळा बंद शिक्षण चालू हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात मोबाईल वरून ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. पालक विद्यार्थी यांच्या गृहभेटी घेऊन शिक्षणाचे धडे देत आहेत. या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जावून शिक्षण देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळेकडूूून प्रयत्न केला जात आहे. ही प्रक्रिया टप्प्या-टप्प्यात राबविली जात आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी संस्थाध्यक्ष दिलीप बधान, कार्यकारी संचालक रुपेश बधान, मुख्याध्यापक शेखर बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कोतकर, विशाल बेनुस्कर या शिक्षकांनी ईदगाव पाडा येथे जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शिक्षकांच्या हाकेला प्रतिसाद देत अध्ययनासाठी एकत्र आले. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.