भास्कर सोनवणे
इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या ८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. २३ ते ३० डिसेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ जानेवारीला मतदान तर निकाल १८ जानेवारीला जाहीर होणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने प्रभावी नियोजन केले असल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.
इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली, बलायदूरी, टिटोली, फांगुळगव्हाण, तळोघ, भरविर बुद्रुक, गरुडेश्वर, शेनवड खुर्द ह्या ८ ग्रामपंचायतींची निवडणूक आज घोषित झाल्या. १५ डिसेंबरला निवडणुकीच्या नोटीसीची प्रसिद्धी करण्यात येईल. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ ते ३० डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या कालावधीत दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला सकाळी ७. ३०ते ५. ३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. इगतपुरी तहसील कार्यालयात मतमोजणी १८ जानेवारीला करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अत्यंत चुरस आणि तीव्र स्वरूपाच्या स्पर्धा या निवडणुकीत दिसून येतील. यासाठी विविध गटांच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून उमेदवारांची विक्रमी संख्या निवडणुकीत दिसून येईल. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने विविध खबरदारी घेतली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काही गावात हेवेदावे
काही गावांत राजकीय हेवेदावे, जातीय राजकारण, राजकीय संवेदनशील वातावरण, तीव्र चुरस असल्याच्या गोपनीय माहितीनुसार तिन्ही पोलीस ठाण्यांनी दक्षता घेण्यासाठी पाऊले उचलली आहेत. कायदा सुव्यवस्था राखून शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय असल्याचे इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी सांगितले