नाशिकचे कास पठार अर्थात अंजनेरी
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या मेन रांगेतून निघणारी,पूर्वेकडे जाणारी त्रिंबक डोंगर रांग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.गिरीपर्यटन करणाऱ्यांसाठी आवडीचे अनेक डोंगर,किल्ले ह्या मध्ये येतात. छोट्या जमिनीच्या टेकड्या, नंतर बसाल्टचे उंच बेलाग कडे, आणि माथ्यावर पुन्हा जमीन अशी काहीशी रचना असलेले हे डोंगर. त्यात समुद्रसपाटीपासून सर्वात उंच असलेला अंजनेरी डोंगर ,त्याच्यावर असणाऱ्या पुष्पवनस्पती वैविध्याने आगळा ठरतो.पावसाळ्यातील भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर, सप्टेंबर ते फेब्रुवारी ह्या महिन्यांपर्यंत येथे विविध पुष्पवनस्पती डोलताना दिसतात. अशा या जैवविविधतेने नटलेल्या अंजनेरीची माहिती आपण घेऊया.
माझी ,नाशिक जिल्ह्यात गड किल्ल्याची खरी ओळख अंजनेरी वरूनच झाली. नवरा नवरी सारखे सुळके आणि दोन्ही बाजूनी कातळ कडे लाभलेल्या या डोंगरावर माथ्यावर पठारी भाग पण आहे. मुख्य म्हणजे वानरांचा त्रास नाही ब्रह्मगिरीसारखा.
अंजनेरी गाव तसे छोटे ,पण जवळपास 700 वर्षांपूर्वीची जैन धर्मियांची दगडी मंदिरे मात्र गावाच्या सुरवातीला छायाचित्रकाराला मोह पाडतात. गावापासून काही अंतर चढाई केल्यावर आपण कातळाच्या पायथ्याशी पोहोचतो. त्यातून वर जायला सुंदरशी घळ आहे. त्यातून चढताना पावसाळ्यात खूप मजा येते. आता मात्र सिमेंटच्या पायऱ्या केल्याने मजा गेली आहे.
वरच्या बाजूस पावलाच्या आकाराचे एक सुंदर नैसर्गिक तळे आहे. ब्रिटिश राजवटीत बांधलेला एक पदक बंगला येथे शेजारी दिसतो. ह्या भागात दक्षिणेच्या बाजूला खूप वनराई आहे. वर माथ्यावर हनुमानाचे देऊळ आहे. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
देव असावा पण देऊळ नसावे ह्या मताचा मी आहे. देवा मुळे श्रद्धा वाढते,देवळामुळे धंदा वाढतो आणि निसर्गनासाडी होते. असो,मागीलवर्षी येथे थेट वरपर्यंत रस्ता काढायचे प्रयोजन केले होते, ते निसर्ग प्रेमींनी थोपवून धरले आणि अंजनेरीची जैवविविधतेचे रक्षण केले.
तर अशा या दंडकरण्यातील पर्वतावर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडतात. खरंतर नाशिक मधील दोन व्यक्तींनी याचा खूप अभ्यास केला आणि माहिती उपलब्ध केली व अंजनेरीची नाव जगाच्या पटलावर आणले.
जुई पेठे टिल्लू ,वनस्पतीशास्त्रज्ञ, यांनी प्रथम सुरवात केली आणि जवळपास 355 ,विविध प्रकारच्या वनस्पतींची नोंद केली. त्यातील स्थानिक वनस्पती 120 ते 125 आहेत,त्यातील 33 ते 34 वनस्पती रेअर एनडेनजर्ड स्पेसिज म्हणून ओळखल्या गेल्या. त्यातील 8 ते 10 वनस्पती क्रिटिकल एनडेनजर्ड स्पेसिज म्हणून ओळखल्या.
कंदिलपुष्प ह्या प्रजाती मधील सेरोपेजिया अंजनेरिका ही प्रजाती शोधून काढून ,अंजनेरीची नाव जगप्रसिद्ध झाले. दुसरे वनस्पतीशास्त्रज्ञ,श्री संजय औटी ,आरवायके कॉलेज,यांचा पण अंजनेरीवर प्रगल्भ अभ्यास असून ,त्यांची अंजनेरीवर एक शॉर्ट फिल्म प्रस्तावित आहे.
जवळपास 64 प्रकारची वन औषधींवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. निलकंठ,पांढरी कोरंटी,झंकारा,लाल मुर्गा, गुलाबी कर्णफुल,अजमोड,खरपुडी,नागमणी,पां ढरा सापकांदा,जंगली पुदिना, पिवळा तेरडा, सांजवेल, करटोळी, मुरुडशें ग,रान्हाळद आणि कितीतरी. खर म्हणजे अंजनेरीवर संपूर्ण जैविविधतेवर सखोल अभ्यासाची गरज आहे.
अंजनेरी पर्वतावर खरी मजा श्रावणापासून ते कार्तिक महिन्या पर्यंत येते. पावसाळ्यात असणारे धबधबे, धबधब्यांचे उलटे पाण्याचे फवारे, टूथब्रश ऑर्किड सारखी येणारी पावसाळी झुडुपफुलें,आणि नवरात्रात दिसणारे विविधरंगी फुलांचे ताटवे पाहून मन भरून जाते.
पिवळी सोनकी,निळसर निलाक्षी,हिरवी/ काळी निसुरडी,गुलाबी कोरंटी,जांभळी मंजिरी,काटे रिंगणी,कळलावी आणि कितीतरी रंगांच्या झुडुपफुलांनी अंजनेरीचे पठार जिवंत होते. अगदी प्रती कास पठरासारखे.
अंजनेरीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लांब चोचीच्या गिधाडांची असलेली घरटी. तिन्ही बाजुंनी पसरलेल्या बेलाग कातळ कड्यांवर अंजनेरी,मुळेगाव,पहिने बाजुंनी आपणास गिधाडांची घरटी दगडांच्या कपारीत उंचच उंच दिसतात.
जवळपास 100 ते 200 घरटी येथे आपण साईट करू शकतो. एके काळी गिधाडांची संख्या प्रचंड रोडावली होती,तेव्हा आजूबाजूच्या गावातील लोकांनी,वनविभाग आणि NGO नी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आणि अंजनेरीचे आकाश परत गिधाडांनी बहरू लागले आहे.
त्याच प्रमाणे कोल्हे,बिबट्या,तरस,रानडुक्कर यांचा पण अंजनेरीचा परिसर हा अधिवास ठरला आहे. फुले म्हणल्यावर फुलपाखरे आलीच. जवळपास 80 प्रकारची फुलपाखरे येथे दिसतात.
सर्व फोटो – सतीश रामचंद्र कुलकर्णी