मुंबई – यावर्षी पितृपक्षानंतर नवरात्र – घटस्थापना एक महिना उशीराने येत आहे. कारण यावर्षी शुक्रवार, १८ सप्टेंबरपासून शुक्रवार १६ आॅक्टोबर पर्यंत अधिक आश्विन महिना आला आहे, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात ३६० तिथी होतात. एका सौरवर्षात ३७१ तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ झाल्या की अधिकमास येतो. भारतात अधिकमासाचे ज्ञान इ. सनापूर्वी पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे वेदकालातही होते. ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास धरला जातो. अधिकमहिन्याला पुरुषोत्तममास असेही म्हणतात.
अधिकमासात नित्य नैमित्तिक कर्मे केली जातात परंतु देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, वास्तुशांती इत्यादी धार्मिक कृत्ये केली जात नाहीत. अधिकमासात दान करण्यास सांगण्यात आले आहे. आधुनिक कालात गरजू, गरीबांना अर्थदान, वस्त्रदान, अन्नदान, ग्रंथदान करावे. तसेच रक्तदानही महान पुण्यकारक मानले जाते. भगवान विष्णूना ३३ अनरसे अर्पण केले जातात. यापूर्वी सन २०१८ मध्ये ज्येष्ठ अधिकमास आला होता. आता यानंतर सन २०२३ मध्ये श्रावण अधिकमास येणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकमासातील दान आणि अनारसे यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?p=8012