अधिकमासामागचे विज्ञान आणि शंकासमाधान
- दा. कृ. सोमण (पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक)
—
प्रश्न (१) आपल्या कालगणनेत अधिकमास का व कसा येतो ?
उत्तर- माणसाच्या शरीराचे आरोग्य हे मुख्यत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहार घेतला की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सणांप्रमाणे आहार घेतला जातो. परंतु सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत. ठराविक सण ठराविक ऋतूत यावेत, यासाठी आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. एका राशीत सूर्य असताना दोन चांद्रमहिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला अधिक व दुसरा निजमास असतो. तसेच ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास असतो.
प्रश्न (२) अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा काय संबंध आहे?
उत्तर- एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात. एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षी ११ तिथी झाल्या की ३३ तिथी अधिक झाल्यावर अधिक महिना येतो. दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त ३४ महिने अंतर असते.
प्रश्न (३) आपल्या कालगणनेमध्ये किती वर्षांपूर्वींपासून अधिक महिना धरण्याची पद्धत सुरू आहे ?
उत्तर- इ. सन पूर्व ४ ते ५ हजार वर्षांपूर्वींपासून आपल्या कालगणनेत अधिकमास धरण्याची पद्धत आहे. वेदकालीही कालगणनेत चांद्र- सौर पद्धतीचा मेळ घातलेला होता. त्याकाळीही अधिक महिने धरले जात होते. महाभारतातही अधिकमासांचे उल्लेख आहेत.
प्रश्न (४) भारतातील सर्व राज्यांमधील कालगणना पद्धतीत अधिकमास धरला जातो का ?
उत्तर- नाही. ज्या राज्यांत सौर कालगणना आहे उदा. आसाम, ओरिसा, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे सौर कालगणना आहे. तेथे अधिकमास धरला जात नाही.
प्रश्न (५) अशा प्रकारे चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घातल्याने ऋतू आणि सण यांचे अतूट नाते राहिल का ?
उत्तर- नाही ! हजारो वर्षांनी यात फरक पडत जाणार आहे. कारण येथे सूर्याचा निरयन राशी प्रवेश गृहित धरला जातो. तो सायन राशीप्रवेश गृहित धरायला पाहिजे होता. परंतू आपल्याकडील पंचांगे ही निरयन आहेत सायन पद्धतीवर आधारीत नाहीत.
प्रश्न(६) अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत?
उत्तर – अधिकमासात नैमित्तिक म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतु देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.
प्रश्न (७) अधिकमासाला पुरुषोत्तममास का म्हणतात?
उत्तर- याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना, मलमास असेही म्हटले जाते. या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाही म्हणून एकदा निराश, दु:खी होऊन अधिकमास श्रीविष्णूकडे गेला. श्रीविष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे पाठवले. श्रीकृष्णाने अधिकमासाला “ पुरुषोत्तममास म्हणून लोक या महिन्यात दानधर्म करतील व तो पुण्यकारक होईल “ असे सांगितले. म्हणून अधिकमासाला ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नाव प्राप्त झाले.
प्रश्न (८) अधिकमासात ‘ अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे काय ?
उत्तर- वेदकालातही ‘अपूप ‘ हा एक खाद्यपदार्थ होता. ‘ न पूयते विशीयंति इति -अपूप ‘ जो कुजत नाही तो घारगा’ गहू किंवा तांदूळ यांच्या पिठात तूप व गूळ मिसळून तळलेला वडा ! विशेष म्हणजे ऋग्वेदातही ( १०/४५/९ ) याचा उल्लेख आहे. रूप म्हणजे वडा, अपूप म्हणजे अनरसा! अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा व ३३ अनरसे दान करावेत असे, सांगण्यात आले आहे.
प्रश्न (९) मग ३३ अनरसे विष्णू ऐवजी जावयाला का देतात ?
उत्तर- जावई हा विष्णूसमान असतो. म्हणून जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे. आधुनिक कालात अधिकमासात गरजू गरीबांना ग्रंथदान, अर्थदान, अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान करावे. सध्या कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अशांना मदत करावी. रक्तदान करावे. नेत्रदान, अवयवदानाचा संकल्प करावा. हे पुण्यदायी आहे.
प्रश्न (१०) सर्वच महिने अधिक येतात का ?
उत्तर – नाही. सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिक येतात. कार्तिक, मार्गशीर्ष व पौष हे महिने क्षयमास होतात. माघ महिना कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.
प्रश्न (११) तुम्ही क्षयमास म्हणालात . तो काय प्रकार आहे ? क्षयमास म्हणजे काय ?
उत्तर- कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीप्रवेश करतो. तो क्षयमास असतो. क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात. क्षयमास साधारणतः १४१ किंवा १९ वर्षांनी येतो.
प्रश्न (१२) पूर्वी कधी क्षयमास आला होता? यापुढे कोणत्यावर्षी येणार आहे ?
उत्तर- यापूर्वी शके १९०४ (सन १९८२) मध्ये पौष क्षयमास आला होता, त्यावर्षी आश्विन आणि फाल्गुन हे अधिकमास आले होते. यानंतर शके २०४५ (सन २०६० ) मध्ये मार्गशीर्ष महिना क्षयमास येणार आहे.
प्रश्न (१३) कार्तिक अधिकमास कधी आला होता का ?
उत्तर – शके १८८५ ( सन १९६३ ) मध्ये कार्तिक अधिकमास आला होता. परंतू त्यावेळी मार्गशीर्ष महिना क्षयमास आला होता.
प्रश्न (१४) यावर्षींच्या अधिक आश्विनमासासापूर्वी कोणता अधिकमास आला होता ?
उत्तर- यापूर्वी १६ मे ते १३ जून २०१८ या कालात ज्येष्ठ अधिकमास आला होता.
प्रश्न (१५) यावर्षींच्या आश्विन अधिकमासानंतर पुढचे कधी व कोणते अधिकमास येणार आहेत ?
उत्तर- १) १८ जुलै ते १६ आॅगस्ट २०२३ -श्रावण,
२) १७ मे ते १५ जून २०२६ — ज्येष्ठ ,
३) १६ मार्च ते १३ एप्रिल २०२९- चैत्र.
४) १९ आॅगस्ट ते १६ सप्टेंबर २०३२- भाद्रपद,
५) १७ जून ते १५ जुलै २०३४ – आषाढ,
६) १६ मे ते २३ जून २०३७ – ज्येष्ठ,
७) १९ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर २०३९- आश्विन,
८) १८ जुलै ते १५ आॅगस्ट २०४२ – श्रावण,
९) १७ मे ते १५ जून २०४५ – ज्येष्ठ,
१०) १५ मार्च ते १३ एप्रिल २०४८ – चैत्र,
११) १८ आॅगस्ट ते १६ सप्टेंबर २०५० – भाद्रपद अधिकमास येणार आहेत.
प्रश्न (१६) दुष्काळात तेरावा महिना ‘ असे म्हणतात ते खरे आहे का ? कोरोनाचा आणि अधिकमास यांचा काही संबंध आहे का ?
उत्तर – ‘दुष्काळात तेरावा महिना ‘ ही म्हण खरी नाही. तुम्हीच सांगा , यावर्षी अधिकमास आहे. पण दुष्काळ कुठे आहे ? त्यामुळे ही म्हण खरी नाही. पूर्वी ज्या ज्यावेळी अधिकमास आला, त्यावेळी कोरोना कुठे आला ? तेव्हा कोरोना आणि अधिकमास यांचा काहीही संबंध नाही.
प्रश्न (१७) हे वर्ष तेरा महिन्यांचे आहे, पण पगार १२ महिन्यांचाच मिळणार आहे. आपली फसवणूक होतेय का ?
उत्तर – नाही. अजिबात नाही. पगार चांद्र महिन्यांप्रमाणे नसतो. जर तो चांद्रमहिन्यांप्रमाणे दिला तरीही तेरा चांद्रमहिने काम करावे लागेल ना ? मग फसवणूक कशी असेल!
खुपचं छान आहे, साहेब
????