नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज सह शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, बंद असून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. शाळा बंद तरीही काही खासगी शैक्षणिक संस्थांकडून शैक्षणिक शुल्कसाठी तगादा सुरु असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. याबाबत सिडको, सातपूर, इंदिरानगर भागातील अनेक पालकांनी शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक नोकरदार, कामगार छोटे उद्योग – व्यवसायिक यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक उद्योग,व्यवसाय ठप्प झाल्यामुळे नोकरदार वर्ग , कामगार वर्ग यांना आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचण निर्माण होत आहे .सध्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका सुरू असून शैक्षणिक शुल्क न भरल्यास तासिका बंद केल्या जातील, असे शाळांकडून सांगण्यात येत आहे . शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा कडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे असे वारंवार सांगण्यात येत असून यासंबंधी पालकांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे पालकांनी यासंबंधी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पूर्ण शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे. काही इंग्रजी शाळांनी नियम धाब्यावर बसून कामकाज सुरू ठेवले आहे . शिक्षकांचे वेतन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे. तसेच यंदा शैक्षणिक संस्था बंद असल्याने संगणक, प्रयोगशाळा, शाळांची बससेवा आधीचा वापर बंद आहे, तरी देखील काही खासगी शाळांकडून शुल्क मागण्यात येत आहे, सरकारी अधिकारी याची दखल घेत नसल्याने याबाबत राज्य मंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
Attachments area