नाशिक – कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेले मिशन झिरो नाशिक हे प्रत्यक्षात हिरो ठरत असल्याचे दिसत आहे. “मिशन झिरो नाशिक” या एकात्मिक कृती योजनेच्या आजच्या २३ व्या दिवशी ११०८ नागरिकांनी अँटीजेन चाचण्या करून घेतल्या आहेत. त्यापैकी १९६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या २३ दिवसात ३२ हजार ४७१ अँटिंजेन चाचण्या झाल्या असून त्या ३ हजार ९२५ कोरोना रुग्ण शोधून काढण्यात यश आले आहे. शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण १२ टक्के एवढे दिसून येत आहे.
नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे पुढाकाराने मिशन झिरो नाशिक हाती घेण्यात आले आहे. लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात या मिशनमध्ये यश येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच औषधे व उपचार करणे , आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे ह्या मुळे सदरील रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारिरीक व मानसिक बळ देण्यात तसेच पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात मिशन झिरो नाशिक अभियानाला मोठ्या प्रमाणावर यश येत आहे.
नागरीकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड अँटिंजेन टेस्ट चाचण्या करून घ्याव्यात. तसेच आवश्यकेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणी करिता समाज कल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रुग्णांनी संपर्क करावा व कोविड मुक्त नाशिक च्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे , उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला, दिपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा यांनी केले आहे.