चिनी गुप्तचर संस्था भारतात राष्ट्रपतींपासून ते एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुपर्यंत सर्व महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवून आहेत असा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राने आज केला आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य अडचणीत सापडलेले असताना अशी बातमी प्रसिद्ध हावी हा काही अजब योगायोग नाही. हे एकप्रकारचे माहिती युद्धच आहे.
दिवाकर देशपांडे
(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आणि संरक्षणशास्त्र तज्ज्ञ आहेत)
चीन भारतापेक्षा सर्व क्षेत्रात कसा पुढे आहे, त्याचे तंत्रज्ञान कसे प्रगत आहे, त्याचे लष्कर भारतापेक्षा कसे बलवान आहे, एकूणच चीन भारताला कसा कच्चा खाऊ शकतो हे सांगणाऱ्या बातम्या, व्हिडिओ, सॅटेलाईट चित्रे, लेख गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होऊ लागले आहेत. चीनने भारताविरुद्ध बहुअंगी युद्ध छेडले आहे, त्याचाच हा भाग आहे. त्यामुळे या आघाडीवरही भारताला लढावे लागणार आहे.
सध्या तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, कुणीच कुणापासून काही लपवू शकत नाही. इंटरनेट, आकाशातील उपग्रह, मोबाईल तंत्रज्ञान या माध्यमांतून जगातल्या कानाकोपऱ्यातून डेटाप्रवाह वाहत असतो. त्यात विविध प्रकारची माहिती खच्चून भरलेली असते. तिचा वापर प्रत्येक जण आपापल्या फायद्यासाठी करीत असतो. साधा चोरही हल्ली बँकांतील खात्यांची माहिती काढून बँकखात्यातून परस्पर रकमा पळवीत असतात. त्यामुळे भारताचे लष्करप्रमुख सकाळी उठून कोणत्या कारमधून कोणत्या लष्करी ठाण्यावर गेले आहेत, ही माहिती लपवायची म्हटले तरी लपत नाही. तसेच भारताच्या कोणत्या युद्धनौका कोणत्या बंदरावर आहेत, हेही लपत नाही.
सीमेवर भारतीय किवा चिनी लष्कराची कोणती हालचाल चालू आहे, हे टिपण्यासाठी उपग्रह, ड्रोन, उच्चक्षमतेचे कॅमेरे सतत नजर रोखून आहेत. त्यामुळे चिनी गुप्तचर संस्था भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवून आहेत ही बातमी सोळा आणे शिळी आहे. सर्वच देश हे सर्व करीत असतात. भारतही यात मागे आहे असे समजण्याचे कारण नाही. आपण जगात फार अप्रगत आहोत, आपल्यात स्ट्रिट स्मार्टनेस नाही, वगैरे गैरसमज आपण आपलेच करून घेतले आहेत आणि काही तुच्छतावादी पत्रपंडित हे गैरसमज आपल्या लिखाणातून आपल्या मनात सतत रुजवीत असतात. पण जग तसे काही समजत नाही. भारताची दुर्बलस्थाने व बलस्थाने याची जगाला चांगली माहिती आहे.
लडाखमधील तणाव सुरू झाला तसे एक इंग्रजी वृत्तवाहिनी सतत उपग्रह चित्रांचा हवाला देऊन चीनने किती भयानक युद्धसामुग्री नियंत्रण रेषेवर जमवली आहे व त्याने कशी हानी होऊ शकते, याचे चित्तथरारक वर्णन आपल्या बातमीपत्रातूंन करीत असते. याचा फायदा काय तर त्या वाहिनीला टीआरपी मिळत असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, चीन आपली गुप्त युद्धतयारी उपग्रहांना दिसेल अशा पद्धतीने करील काय. चीनचे हे दाखवायचे दात आहेत. चीनची प्रत्यक्ष युद्ध करून मोठी हानी पत्करायची तयारी नाही, त्याला गोळीही न झाडता युद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी हे सर्व प्रचारयुद्ध आहे.
संरक्षणविषयक इंग्रजी मासिकाचे एक संपादक आहेत. त्यांचे विवेचन ऐकल्यावर तर ते चीनच्या ग्लोबल टाइम्स या प्रचारी वर्तमानपत्रात तर काम करीत नाहीत ना अशी शंका यावी. ते लडाखमध्ये चीनने जमवाजमव केली तेव्हापासून युट्यूबवर व्हिडिओ टाकून चिनी हालचालींचे लष्करी विवेचन करीत असतात. त्यांनी तर आपल्या विवेचनात सतत चीनच्या राक्षसी बळापुढे भारताचा निभाव लागणार नाही, त्यामुळे भारताने चीनचे म्हणणे मान्य करावे व माघार घ्यावी असे थेट सुचवले आहे.
ज्या दिवशी जयशंकर आणि वाँग यी यांच्यात सैन्य मागे घेण्याच्या समझोता झाला त्याच दिवशी रात्री त्यांनी एक व्हिडिओ टाकून या करारातील सगळी कलमे कशी चीनच्या फायद्याची आहेत, हे हातातील कागद वाचत कलमवार सांगितले. हे कागद इतक्या तातडीने त्यांना कुठून उपलब्ध झाले याची खरे तर भारतीय गुप्तचर खात्याने चौकशी करायला हवी. ही कलमे चीनच्या फायद्याची आहेत, हे जयशंकर याना कळलेच नाही आणि या संपादक महाशयांना कळले असे म्हणावे का?
चीनच्या गुप्तचर संस्था भारतात कार्यरत आहेत हे नाकारण्यात अर्थ नाही. विशेषत इलेक्ट्रॉनिक उद्योगात या हेरांनी खूप मोठा शिरकाव केला आहे. भारताने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर चीनचे जितके आर्थिक नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान या गुप्तचर संस्थांचे झाले आहे. त्यामुळे चीनची सतत मागणी चालू आहे की, व्यापार आणि सीमेवरील वाद यांची सांगड घालू नका, दोन्ही वेगळे ठेवा. म्हणजे चीनला दोन्हीकडचे युद्ध गोळीही न झाडता जिंकता येईल. सुदैवाने भारतानेही चीनच्या या बहुअंगी युद्धाला बहुअंगी आघाड्यांवरच तोंड द्यायचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत सरकारचीही प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे आणि तिनेही चिनी प्रचारयंत्रणेची पोलखोल सुरू केली आहे.
चीन हा जगातला एक मोठा बागुलबुवा आहे. चीनशी टक्कर घेण्याची भारताची क्षमता नाही, हे तो विविध प्रकारे भारतीयांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामागचा हेतू चीनला कोणतीही हानी न पत्करता त्याचे राजनीतिक हेतू साध्य करता यावेत हा आहे. पण आपण तसे होऊ देणार का हा प्रश्न आहे. शेवटी युद्ध झाले तर त्यात त्यात हारजीत ठरलेली आहे, पण युद्धाचे वाईट परिणाम ते जिंकणाऱ्यालाही भोगावे लागणार आहेत, हे भारतीयांनी विसरू नये. हे युद्ध टाळायचे असेल तर भारताला चीनपेक्षाही मोठ्या आवाजात बोलावे लागेल. आजवर आपण दबक्या आवाजात बोलत होतो, त्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. हा युद्धज्वर वाढविण्याचा प्रयत्न नाही. युद्ध होणे भारताच्या हिताचे अजिबात नाही, पण ते झालेच तर ते चीनच्याही हिताचे ठरणार नाही. त्यामुळे ते टाळण्याचा सतत प्रयत्न करायला हवा..