बिग बाजारची नवी सेवा; आता अवघ्या २ तासांत सामानाची होम डिलिव्हरी

नवी दिल्ली – बिग बाजारचे मोबाइल ऍप किंवा ऑनलाइन तुम्ही सामानाची ऑर्डर दिली असेल, तर आता अवघ्या 2 तासांत हे सामान तुम्हाला घरपोच मिळेल. बिग बाजार आता तात्काळ होम डिलिव्हरीची सेवा देणार असल्याचे फ्युचर ग्रुपचे सर्वेसर्वा किशोर बियाणी यांनी गुरुवारी जाहीर केले होते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर ऑनलाइन ऑर्डर दिली तर पुढच्या २ तासांत सामान घरपोच मिळेल. तातडीने मिळणार असल्याने तुम्ही यात खाण्या-पिण्याच्या वस्तू, कपडे, एफएमसीजी उत्पादने तसेच वाणसामान मागवू शकता.
सध्या ही सेवा दिल्ली – एनसीआर, मुंबई आणि बंगळुरू या शहरांमध्ये मिळणार आहे. मात्र, लवकरच अन्य शहरांमध्येही ही सेवा देण्याचा आमचा मानस असल्याचे फ्युचर ग्रुपचे अध्यक्ष (फूड आणि एफएमसीजी) कमलदीप सिंह यांनी सांगितले.
पुढच्या दोन तीन महिन्यांत दिवसाला एक लाखांच्या ऑर्डर मिळतील अशी आम्हाला आशा आहे. आणखी पाच ते सहा महिन्यांत देशभरातील बिग बाजारच्या प्रत्येक स्टोअरकडून ही सुविधा दिली जाईल, असेही सिंह म्हणाले. देशातील १५० शहरांत बिग बाजारची २८० हून अधिक स्टोअर्स आहेत.
या सेवेअंतर्गत तुम्हाला किमान ५०० रुपयांचे सामान मागवावे लागेल. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सामानासाठी ४९ रुपये डिलिव्हरी चार्जेस असतील. तर हजार रुपयांच्या पुढच्या सामानासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सेवा आमच्यासाठी गेम चेंजर ठरेल असे सिंह सांगतात.