इंटरनेट आणि तंत्रज्ञान हे आता सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, अनेकदा अज्ञानामुळे अनेक बाबींचा प्रभावी वापर करण्यापासून असंख्य वंचित राहतात. त्या सर्वांसाठी उपयुक्त हे सदर खास ‘इंडिया दर्पण लाईव्ह’च्या वाचकांसाठी…
गूगल मॅप्स
गूगल मॅप्स हे मानवाला मिळालेले वरदान आहे. अगदी अनोळखी प्रदेशात गेलात तरी गूगल मॅप च्या मदतीने हव्या त्या ठिकाणी नेमके पोचू शकता. रस्त्याने जाताना कोणाला विचारात विचारात जाण्याची गरज नाही. या गूगल मॅप मध्ये सतत सुधारणा होत आहे आणि आजपासून दिलेली सुविधा खूपच उपयोगी पडणार आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे जंगलात वणवे पेटले आहेत आणि हजारो एकरातील वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. तुम्ही या आगीच्या जवळ राहात असाल तर ही आग कुठवर पोचली आहे, तिचा आपल्याला धोका आहे का , अशी काळजी तुम्हाला नक्की वाटत असेल.
आता काळजीचे कारण नाही. गूगल मॅप वर तुम्ही आगीची माहिती शोधली की Real Time results तुम्हाला मिळतील. आग ज्या भागात पसरली आहे तो भाग नेमका गूगल मॅप वर दिसेल. तुमच्या घराच्या जवळ तो भाग असला तर सतत अलर्ट येत राहतील. आग जसजशी मागेपुढे होत राहील, तसतसा हा गूगल मॅप तुम्हाला बदलता भाग दाखवत राहील. तुमच्या घराच्या दिशेने जर आग येत असेल तर तुम्हाला वेळीच बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जायला मदत होईल. ही सोय गेल्या वर्षी फक्त कॅलिफोर्नियाच्या काही भागात उपलब्ध होती. आता ती संपूर्ण अमेरिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्हाला हव्या त्या भागाच्या सीमा दिसतील. यामुळे मोठाच फायदा होईल. गूगल मॅप आतापर्यंत फक्त रस्ता दाखविण्याचे काम करायचे , आता तुमचा जीवही वाचवेल.
प्रत्येक फोनधारकाला Whatsapp वापरणे जणू आवश्यक झाले आहे. जवळच्या लोकांशी संपर्क ठेवण्यापासून ते कार्यालयीन / व्यावसायिक कामापर्यंत सगळ्यांसाठीच Whatsapp आवश्यक आहे. अनेक नवीन फीचर्स Whatsapp लावकारच आणणार आहे. त्यातले एक महत्वाचे फीचर म्हणजे Advanced Search . आपल्याला इतके मेसेज येत असतात की फोन भरून जातो. एखादा मेसेज नेमका कधी आला ते लक्षात राहतेच असे नाही. या सर्च सुविधेमुळे ते सोपे होणार आहे. समाज तुम्हाला एखादा फोटो शोधायचा आहे, लगेच सर्च बारमध्ये त्याचा तपशील द्या, तो फोटो तुमच्या समोर हजर होईल. हेच विडिओ, documents याबाबतही खरे आहे.
पण थांबा, हे वाचून लगेच शोधायला सुरुवात करू नका. एखादे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याआधी काही निवडक लोकांना उपलब्ध करून दिले जाते. त्यात काही त्रुटी असल्यास हे लोक कंपनीच्या नजरेस आणून देतात. या लोकांना बीटा टेस्टर्स म्हणतात. हे सर्च फीचर आज Whatsapp ने या लोकांसाठी खुले केले . त्यांचा ओके मिळाला की तुम्हा आम्हाला मिळेल. थोडी वाट पहा ! Whatsapp एकाच वेळेस चार devices वर वापरण्याची सोयही लवकरच उपलब्ध होणार आहे.
- नेटकर्मी