नाशिक – सराईत चैन स्नॅचरला अटक, शहरातील १० सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल

नाशिक – शहर पोलीसांनी श्रीरामपूर येथील सराईत बेग टोळीचा हस्तक सराईत चैन स्नॅचरला अटक केली असून त्याच्याकडून नाशिक शहरातील तब्बल १० सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल झाली आहे.नईम मेहबुब सैय्यद (३०, रा. जुन्या तहसील कचेरीमागे, श्रीरामपुर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी सांगीतले की, नाशिकरोडच्या चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात २६ मार्च रोजी पायी जाणार्‍या महिलेच्या गाळ्यातील सोनसाखळी हिसकवण्यात आली होती. दरम्यान यातील कपिल कृष्णा जेधे व गणेश रामदास बन या दोन संशयितांना नागरीकांनी पाठलाग करून पकडले होते. तर दोघे फरार झाले होते. पकडलेल्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून सराईत नईत सैय्यद व ट्रीपल एक्स उर्फ रॉकी यांची नावे निष्पन्न झाली. गुन्हे शाखा एकच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केल्यानंतर ते पुण्यात असल्याची माहिती मिळाली. पुण्यात तपास सुरू असतानाच ते श्रीरामपूर येथे पोहचले.
या ठिकाणी दोन दिवस पाळत ठेवून तर अखेरीस सीने स्टाईल पाठलाग करून पोलीसांनी नईम सैय्यद यास जेरबंद केले. त्याची कसून चौकशी केली असता. ते दुचाकी चोरून त्यांच्या वापर करत नाशिक शहर परिसरात सोनसाखळ्या हिसकवात होते. त्यांनी दिलेल्या कबुलीप्रमाणे शहरातील १० सोनसाखळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ८ हजार ४०० रूपयांचे १४५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच चोरीची एक दुचाकी असा एकुण ७ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकुर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रविंद्र बागुल,रघुनाथ शेगर, कर्मचारी संजय मुळक, आसीफ तांबोळी, दिलीप मोंढे, फैय्याज सय्यद, विशाल काठे, विशाल देवरे, राहुल पालखेडे, गणेश वडजे, प्रविण चव्हाण यांनी ही कामगिरी पार पाडली.
……
उघड गुन्हे असे
म्हसरूळ – ३
नाशिकरोड – २
भद्रकाली – १
अंबड – १
उपनगर – १
देवळाली कॅम्प – १
पंचवटी – १
लोणी – १