नाशिक – विवाहीतेने सहा महिन्यांच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या

विवाहीतेने सहा महिन्यांच्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेवून केली आत्महत्या
नाशिक : माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीने छळ केल्याने विवाहीतेने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीसह विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी शिवारात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शरद मोहन सोनवणे (रा.भरत अपा.पांडवनगरी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सुकदेव कांगणे (रा.गुळवंच ता.सिन्नर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शरद सोनवणे यांच्यासह सासू हिराबाई सोनवणे,दिर गोरख सोनवणे,जाऊ अर्चना सोनवणे व दिर शिवाजी सोनवणे (रा.बजरंगवाडी,नाशिक पुणा मार्ग) आदींविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता शरद सोनवणे या विवाहीने गुरूवारी (दि.८) आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसह पाथर्डी शिवारातील दोंदे मळय़ातील बबन जाधव यांच्या विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. कांगणे यांच्या तक्रारीवरून संशयीत सासरच्या मंडळीने माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सविता सोनवणे हिचा मानसिक व शारिरीक छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.
……
.
पती व सासूच्या जाचास कंटाळून २७ वर्षीय विवाहीतेने केली आत्महत्या
नाशिक : पती व सासूच्या जाचास कंटाळून २७ वर्षीय विवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना पगार मळा भागात घडली. पतीचे विवाहबाह्य संबध आणि माहेरून पैसे आणावेत या मागणीतून ही घटना घडल्याचा आरोप माहेरकडील मंडळीने केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज भास्कर आहेर (३१) व लता भास्कर आहेर (६० रा.दोघे पार्क साईड होम्स,हनुमाननगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पती आणि सासूचे नाव आहे. याप्रकरणी योगेश सुरेश आहिरे (रा.संगमेश्वर मालेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिल्पा पंकज आहेर या विवाहीतेने गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. आहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती पंकज आहेरचे विवाहबाह्य संबध होते. त्यामुळे तो मद्याच्या नशेत शिल्पाला शिवागीळ व मारहाण करीत असे तसेच पती व सासू कडून माहेरून पैसे आणावेत यासाठी दबाव टाकला जात होता. यातूनच तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.