देशात एवढ्या जणांकडे आहे मोबाईल आणि इंटरनेट

प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली – सध्याचे युग हे मोबाईल आणि इंटरनेटचे समजले जाते. त्यामुळे भारतात या दोन्ही गोष्टींचा वापर प्रचंड वाढला आहे. जानेवारी २०२१ पर्यंत देशात ९६ लाख टेलिकॉम (फोन व मोबाईल) ग्राहकांची संख्या वाढली असून आता त्यांची एकूण संख्या ११८ कोटी ३४ लाख झाली आहे.  इंटरनेट ग्राहकांची संख्या देखील ७४ कोटी ७४ लाखांवरून आता ७५ कोटी ७६ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
      भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ३१ जानेवारी २०२१ पर्यंतचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती समोर आली आहे. दिल्लीत या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अहवालानुसार, रिलायन्स जिओकडे सर्वाधिक ३५ टक्के मोबाइल फोन ग्राहक आहेत. जानेवारी मध्ये त्यात सुमारे १९ लाख नवीन ग्राहकांची भर पडली आहे. त्याचवेळी एअरटेलने २९.६२ टक्क्यांसह आघाडी घेत जिओच्या तुलनेत ५९ लाख म्हणजेच तीन पट अधिक नवीन ग्राहकांची भर घातली. त्यात टाटा टेली सर्व्हिसेस लि.  ग्राहक सहभागी होणे देखील एक कारण होते.  तसेच व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक २४.५८ टक्के, बीएसएनएलचे १०.२१ टक्के आणि एमटीएनएलच्या ०.२८ टक्के आहेत.
      इंटरनेटचे एका महिन्यात १० दशलक्ष नवीन कनेक्शन बनले आहे. भारतातील इंटरनेट ब्रॉडबँड ७५.७६ कोटी लोकांपर्यंत पोहोचले आहे. त्यापैकी ७३.४२ कोटी मोबाइल फोनवरून इंटरनेट घेत आहेत.  त्याच वेळी, अन्य ग्राहकांना वायर-कनेक्शनवर आधारित इंटरनेट मिळत आहे.  डिसेंबरमध्ये ७४.७४ कोटी लोकांकडे इंटरनेट होते.  म्हणजेच एका महिन्यात सुमारे १.३६ टक्के वाढ झाली आहे. यात जिओ देखील येथे आघाडीवर आहे.