नाशिक – देवळाली कॅम्प परिसरात एक आठवड्यात तब्बल ३३ व्यावसायिकांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ५ ऑगस्ट रोजी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दुकाने सायंकाळी सात वाजता बंद करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र काही व्यावसायिक या आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.
देवळाली परिसरात पुन्हा करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागलेला असताना काही व्यवसायिक सात वाजे नंतरही आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाने १५ सप्टेंबर पासून सात वाजे नंतरही दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर एक हजार रुपये दंडाची आकारणी केली आहे. पुन्हा तोच व्यावसायिक सात वाजेनंतर आढळल्यास दोन हजार तर दुसऱ्यांदा आढळल्यास तीन हजार रुपये व त्यानंतरही पुन्हा दुकान सुरू ठेवल्यास दुकान प्रशासनाने सक्तीने बंद करण्यास भाग पाडणे अशा नियम करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने केलेल्या पहिल्याच कारवाईनंतर सर्व दुकाने सात वाजेला बंद केली जात आहे.