नाशिक – कोवीड १९ रुग्णांसाठी सेवाभावी जाणिवेतून मदत करणार्या अनेक सामाजिक संस्था ह्या प्रशासनाच्या प्रयत्नांना ऊर्जा देत असून त्यातून बळ मिळत आहे. त्यामुळे ही लढाई सहज जिंकू. समाजाचं दु:ख, हे आपल्या जवळच्या व्यक्तीचे आहे. आणि त्या जाणिवेतून अनेक सेवाभावी संस्था, व्यक्ती ह्या प्रशासनाचा मदतीचा हात झाल्या आहेत. त्यातूनच कृतीशील कार्याचे योगदान मिळत आहे. हे दिलासा देणारे आहे. सर्व जनतेचे सुरक्षेविषयक नियमांचे पालन करावे आणि कोवीड रोखण्यासाठी सहकार्य करावे. विश्वास ज्ञान प्रबोधिनी सारख्या संस्था याकामी पुढाकार घेत आहेत हे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक व कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये ३०० पुस्तके भेट देण्यात आली. त्याप्रसंगी गमे यांनी हे विचार व्यक्त केले. विश्वास ठाकूर यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.
यावेळी बोलतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, कोवीड हे आपल्या सर्वांवर आलेले संकट असून ते दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा. सोशल डिस्टन्सिंग बरोबरच मनाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. त्यामुळे मन आनंदी राहण्यासाठी मदत होईल. महानगरपालिकेतर्फे जनतेसाठी आरोग्यसुविधा तातडीने उपलब्ध होत आहेत हे निश्चितच सर्वसामान्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. यावेळी ग्रंथ तुमच्या दारी चे शिल्पकार विनायक रानडे उपस्थित होते. विश्वास ज्ञान प्रबोधिनीतर्फे सातत्याने आरोग्यविषयक व समकालीन प्रश्नांचा वेध घेणार्या घटनांवर वेळोवेळी सामाजिक जाणिवेतून उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.