नवी दिल्ली – नागरी सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार असल्याचे वृत्त सध्या प्रचंड व्हायरल झाले आहे. मात्र, अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेले नाही असे केंद्रीय लोक सेवा आयोगाने (युपीएससी) म्हटले आहे. ज्या उमेदवारांची चाचणी नकारात्मक येईल त्यांनाच या परीक्षेला बसू दिले जाईल, असे त्या वृत्तात म्हटले होते. ही बातमी खोटी असून अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती तपासून पाहावी, असे आवाहनही आयोगाने केले आहे.