सातपूर – सिडको परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल केला, हे चांगले झाले. पण असे हल्ले पुन्हा होणार नाहीत, यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी. एल. कराड यांनी केली आहे.
कोरोना च्या प्रादुर्भावाच्या काळात सामान्य माणसाला उपचाराच्या सुविधांची कमतरता जाणवत आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड्स नसल्यामुळे अनेकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. अशा परिस्थितीत उपचाराबाबत किंवा बिलाबाबत वाद होऊन काही समाजकंटक डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसून येत आहेत .यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे. रुग्णांना उपचार करण्याबाबत नकारात्मक सूर निघत आहे. याचा सामान्य जनतेला त्रास होईल.
डॉक्टर आणि रुग्ण व नातेवाईक यांच्यामध्ये सुसंवादाचे संबंध असणे आवश्यक आहे, परंतु काही वेळेला समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेतात व यातून या घटना घडत आहेत.
महापालिका व जिल्हा प्रशासनाने याबाबत जनतेशी संवाद साधून जागृती निर्माण करणे आवश्यक वाटते. हॉस्पिटलच्या बिलाबाबत शहानिशा करण्यासाठी अॅाडीटर नेमले आहेत, या माध्यमातून बिलाबाबतचे वाद सोडविणे शक्य आहे. या व्यवस्थेचा उपयोग करून शंकानिरसन करून घेणे योग्य होईल. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, त्यांना मारहाण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. काही हॉस्पिटल्स अवाजवी बिल आकारणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत हॉस्पिटलनी आत्मपरीक्षण केले पाहिजे व बिल आकारणी केली पाहिजे असे मतही डॅा. कराड यांनी व्यक्त केेले.