कोरोनाच्या भीतीने पुन्हा मजूर गावाकडे; हायवेवर लांबच्या लांब रांगा

संग्रहीत फोटो
संग्रहीत फोटो
नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन सुरू झाले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आणि संपूर्ण लॉकडाउन लागल्यास उपासमार होईल या भीतीने कामगार आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. त्यामुळे  हायवेवर मजूरांच्या लांब रांगा दिसत आहेत.
        गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. यावेळी पुन्हा असा त्रास टाळण्यासाठी स्थलांतरितांनी आधीच स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.  हरियाणाच्या सोनीपतमध्ये घरी परत जाणाऱ्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर एक समांतर लाईन तयार करण्यात आली आहे.  त्याचबरोबर बसेसने जाणाऱ्या मजूरांचीही मोठी गर्दी दिसत आहे. कामगारांच्या या परतीच्या प्रवासामुळे व्यवसाय आणि उद्योगांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.
       गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले तेव्हा अचानक वाहतूक थांबल्यामुळे स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी मजुरांना अन्न पाण्याची समस्या उद्भवली होती. तेव्हा अनेक जण पायीच निघाल्याने शेकडो किलोमीटर चालल्यानंतर  कसेबसे ते आपल्या घरी पोहोचले होते. त्यानंतर चार पाच महिन्यानी कारखाने सुरू झाले म्हणून कामगार परत आले. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनामधील परिस्थिती वाढू लागली. त्यामुळे लॉकडाऊनच्या भीतीने प्रवासी मजूर गावी पळून जाऊ लागले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर गर्दी असून खासगी ट्रॅव्हल्स कंपनीचे लोक तेथून सकाळी व संध्याकाळी उत्तर प्रदेश आणि बिहारला बस पाठवतात आणि परप्रांतीय गावी जातात. दरम्यान, स्थलांतरित मजुरांच्या परतीमुळे उद्योजकांचे प्रश्न वाढू लागले आहेत. कारण मागील वर्षी कोरोनामुळे कारखाने बंद झाले होते, त्यानंतर आता पुन्हा परिस्थिती सामान्य होऊ लागली होती, पण आता कोरोनाच्या भितीने कामगार पुन्हा स्थलांतर करण्यास सुरवात करू लागले.
अशा परिस्थितीत उद्योजकांसाठी कामगारांचे संकट उद्भवू शकते आणि उद्योग त्यांच्यावर परिणाम होण्याची भीती आहे. महाराष्ट्रातील मजूर देखील आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जात असल्याने मुंबईच्या विविध बसस्थानक आणि रेल्वे स्टेशनवर मजुरांची गर्दी दिसत आहे.