मुंबई – केंद्र सरकारने २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप हंगामात प्रतिटन २८५० रूपये एफआरपी मिळणार आहे. यापूर्वीचा एफआरपी दर २७५० रूपये होता. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर दिवे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना संकटकाळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत शेती क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधा साठी १ लाख कोटी रूपयांचा निधी दिला, महाराष्ट्रातील रब्बी पिकांच्या खरेदीच्या मर्यादेत आणि मुदतीतही वारंवार वाढ करून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या एफआरपी वाढीच्या निर्णयाचा ही शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आहे, असे दिवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, केवळ १०० रुपये वाढवून काहीच साध्य होणार नसल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिली आहे.