‘बियोंड मेडिसिन: ए टू ई फोर मेडिकल प्रोफेशन्ल्स’ पुस्तकाचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
नाशिक – वैद्यकीय क्षेत्रात गुणवत्तेबाबत येणाऱ्या समस्यांमुळे प्रभावित होणारे सामाजिक वातावरण आणि वैयक्तिक ताणतणाव, हिंसाचार हे निकडीचे विषय आहेत. याच विषयावर वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. संदीप माने, डॉ. सुनिल थिदमे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे.
‘वियोंड मेडिसिन: ए टू ई फोर मेडिकल प्रोफेशन्ल्स’ (Beyond Medicine : A to E for Medical Professionals) असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर आदी मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन होणार आहे.
पुस्तकाचे लेखक डॉ. कालीदास चव्हाण यांनी सांगितले की, या पुस्तकात वैद्यकीय क्षेत्रातील विविध मार्गदर्शक तत्व आणि दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधान मिळविण्यासाठी उपयोगी पडतील असे सूत्र मांडण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना बरेच डॉक्टर यशस्वी होतात काही नैराश्याच्या भावनेतून मानसिकता ढासळून घेतात. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी औषधापलीकडे ज्या ज्या गोष्टी आवश्यक असूनही दुर्लक्षित आहेत त्यावर व्यवस्थित प्रकाश टाकण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रत्यक्ष औषध व्यतिरिक्त अन्य बाबी औषधाप्रमाणेच उपयोगी असतात. यामध्ये डॉक्टर-रुग्ण संबंध सुधारणे मानवतेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण आहे. आरोग्यदायी समाज व सामाजिक स्वास्थ्य मजबूत करण्यातसाठी आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना हे पुस्तक वरदान ठरणार आहे. या पुस्तकात ओरिजिन फांडेशनचे संचालक डॉ. संदिप माने व डॉ. सुनिल थिदमे यांनीही डॉक्टर-रुग्ण संबंधावरील प्रश्नावर उलगडाच केला असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार (५ सप्टेंबर) रोजी सायंकाळी ५ वाजता www.parthlive.com या संकेतस्थळावरुन ऑनलाईन होणार आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, विद्यार्थी व अभ्यासक यांनी पुस्तकाचा प्रकाशन सोहळयात ऑनलाईन उपस्थित रहावे असे आवाहन लेखकांकडून करण्यात येत आहे.