नाशिकरोड – अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या राकेश राजेंद्र साळवे हा विद्यार्थी अखेर मायदेशी सुखरुप आला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे सहकार्य मिळाल्यामुळेच तो घरी परतू शकला आहे.
कोरोनाच्या संकट काळात परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने वंदे भारत अभियान सुरू केले आहे. याद्वारे विशेष विमानांच्या माध्यमातून भारतीयांना मायदेशी आणले जात आहे. नाशिकरोड येथील राहूल साळवे यांचे बंधू राकेश हे अमेरिकेत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनीही घराची ओढ घेतली. मात्र, घरी परतायचे कसे असा मोठा प्रश्न होता. राहूल यांनी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मिडिया आयटी सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष आकाश घुसळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना राकेश विषयी माहिती दिली. घुसळे यांनी रिपाइंचे ईशान्य भारत व पश्चिम बंगाल प्रभारी विनोद निकाळजे यांना सविस्तर माहिती दील. त्यानंतर निकाळजे यांनी हा सर्व प्रकार
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आठवले यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांना विशेष मेल केला. त्यात राकेशची सर्व माहिती दिली. त्यानंतर राकेशचे मायदेशी येण्याची प्रक्रिया सुरू झाली. अखेर राकेश हा नाशिकरोडला परतला आहे. मंत्री आठवले रिपाइंचे घुसळे व निकाळजे यांच्यामुळेच राकेश परतल्याची भावना साळवे कुटुंबियांनी व्यक्त केली. तसे आभार पत्र या कुटुंबियांनी मंत्र्यांना पाठविले आहे.