मुंबई – कोरोना विरोधातील लढ्याला आता आणखी बळ मिळाले आहे. वयस्क आणि मध्यम वयोगटातील नागरिकांना लसवंत केल्यानंतर आता लहान मुलांना लस देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले असून, झायडस कॅडिलाच्या कोरोना लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या लशीला झायकोव्ह डी (ZyCov-D) असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे डीएनएवर आधारित ही जगातील पहिली स्वदेशी लस आहे. १२ वर्षांवरील मुलांना ही लस दिली जाऊ शकणार आहे. लशीचे तीन डोस दिल्यानंतर सार्स-सीओव्ही-२ विषाणूच्या स्पाइक प्रोटिनचे उत्पादन होते. विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात.
काय आहेत वैशिष्ट्ये
या लशीची अनेक वैशिष्ट्ये सांगण्यात आले आहेत. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ही लस विनासुईच्या मदतीने फार्माजेट तंत्रज्ञानाने दिली जाईल. यामुळे दुष्परिणामाचे धोके कमी होतात. बिनासुईच्या इंजेक्शनमध्ये औषध भरले जाते. त्यानंतर ते एका मशिनमध्ये लावून दंडावर लावले जाते. मशिनवर लावलेल्या बटणावर क्लिक केल्यानंतर लशीचा डोस शरीरात दाखल होतो.
झायकोव्ह-डी लशीला औषधे महानियंत्रकांकडून मिळालेली मंजुरी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. जगातील पहिली डीएनए आधारित कोविड नियंत्रण लशीला मान्यता मिळणे, हा भारतातील वैज्ञानिकांच्या उत्साहाचा पुरावा आहे, असे गौरोवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
भारतात पाच लशींना मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक-व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा समावेश आहे. यापैकी कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक-व्ही या लशींचा वापर सुरू झालेला आहे. या मंजुरीनंतर झायकोव्ह-डी सहावी लस ठरली आहे. १८ वर्षांवरील लोकांसाठी कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक या लशींचे दोन डोस देण्यात येत आहे. तर जायकोव्ह-डी लशीचे १२ ते १८ वर्षांच्या मुलांना तीन डोस देण्यात येतील.