नवी दिल्ली – भारतातील कोविड विरोधी लढ्याला बळ देणारी गुडन्यूज आहे. देशातील पाचव्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी देण्यात आली आहे. झायडस-कॅडिला कंपनीच्या झायकोव्ह डी या लसीला आपत्कालिन वापरासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यापूर्वी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लसींना मंजुरी मिळाली आहे. झायकोव्ह डी या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ती १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार आहे. तसेच, ही लस इंजेक्शनशिवाय दिली जाणार आहे.
झायडस-कॅडिलाच्या स्वदेशी लसीचे तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ड्रग कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)कडून त्यांना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. या लसीला मिळाल्याने १२ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. ही लस इंजेक्शनशिवाय फार्माजेट या तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे.
जवळपास ३० कोटी डोसची गरज
देशात १२ ते १८ वर्षे वयोगटातील लोकसंख्या १५ कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे यांचे लसीकरण करायचे असेल तर त्यासाठी ३० कोटी डोस आवश्यक आहेत. जर फायझर आणि इतर विदेशी कंपन्यांनी लस दिले तरीही कुठलीच कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस पुरवू शकणार नाही. त्यामुळे स्वदेशी कंपनीच्या माध्यमातून लसीचा पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. झायकोव्ह डीचे मुलांसाठी लसीकरण लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.
डीएनए प्लाजमिड लस
भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत आता महत्त्वाचे शस्त्र हाती आले आहे. झायकोव्ह डी ही डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारची ती जगातील पहिली लस आहे.