नवी दिल्ली – देशात कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी सरकार विविध पातळ्यावर प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनजागृतीसोबतच व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली असून कोरोनावरील लसीकरणाच्या या मोहीमेने अलीकडेच 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. सामान्यत: दररोज सरासरी 80 ते 90 लाख लसीकरण सुरूच आहे. या लसीकरणाचा फायदा होऊन लोकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढणार असून कोरोना आटोक्यात येऊन रोजचे जगणे आणि व्यवहार सामान्य होणार आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि स्पुटनिक अशा लसी उपलब्ध आहेत. लवकरच आता एक कंपनी सुई विरहित लस बाजारात आणणार असून तिची किंमतही माफक असणार आहे.
झायडस क्याडिला असे या कंपनीचे नाव आहे. सुई विरहित असलेली लस कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची या कंपनीसोबत चर्चा सुरू होती. तिला आता यश येत असून ही कंपनी कमी किंमतील लस देण्यास राजी झाली आहे. त्याचा फायदा थेट सामान्य रूग्णांना होणार असून लसीकरण मोहीमेला वेग येण्यास आणि कोरोनाल आळा घालण्यात होणार आहे. अहमदाबाद, गुजरात येथील या कंपनीने सरकारला तीन मात्रांसाठी 1900 रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यात आणखी चर्चेच्या फेऱ्या होऊ शेवटी ही किंमत आणखी घटविण्यात आली आहे.
सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेमुळे झायडस क्याडिलाने त्यांच्या अँटी-कोविड-19 लस जायकोव-डीच्या किमती कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, झायडस क्याडिलाने ने आपल्या लसीची किंमत प्रति डोस 265 रुपये कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, अद्याप अंतिम करार होणे बाकी आहे. सुई-मुक्त जायकोव-डी लसीचा प्रत्येक डोस देण्यासाठी 93 रुपये किमतीचे डिस्पोजेबल पेनलेस जेट अॅप्लिकेटर आवश्यक असेल, असे सूत्रांनी रविवारी सांगितले. यासह जायकोव-डी लसीची किंमत प्रति डोस 358 रुपये असेल.