संदीप दुनबळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पक्षांतर अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात माजी आमदार काशिनाथ मेंगाळ आणि शिवराम झोले यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऐनवेळी राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये आलेले आमदार हिरामण खोसकर यांची कार्यपद्धती पाहता त्यांचा पक्ष या निवडणुकीत त्यांचा शब्द कितपत गांभीर्याने घेईल, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
नेत्यांची महत्त्वाकांक्षा
आदिवासी बहुल असलेला इगतपुरी तालुका राजकीय दृष्ट्याही महत्वाचा मानला गेला आहे. किंबहुना येथील स्थानिक नेत्यांनी महत्वाकांक्षेपोटी त्या-त्या त्यावेळी घेतलेले निर्णय संपूर्ण राज्याच्या लक्षात राहिले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या या तालुक्याने निर्मला गावित यांना दोनदा आमदार केले. तर काशिनाथ मेंगाळ यांनाही विधानसभेची संधी दिली. ऐनवेळी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या हिरामण खोसकर यांची सुद्धा आमदारकीची इच्छा या तालुक्याने पूर्ण केली. वरकरणी या तालुक्यात काँग्रेस आणि शिवसेना प्रबळ दिसत असून शिवसेनेच्या ताब्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक गट आहे. हे चित्र सध्या कागदावर दिसत आहे. कारण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नयना गावित यांच्या मातोश्री निर्मला गावित सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. काशिनाथ मेंगाळ हेही नुकतेच शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतिपद भूषविले होते.
पक्षांतराचा इतिहास
पक्षांतर ही या तालुक्याला लागलेली कीड आहे. निर्मला गावित यांना काँग्रेसने दोनदा आमदार करूनही यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षांतर हे तर मेंगाळ यांच्यासाठी नवीन नाही. शिवसेना, मनसे आणि आता शिंदे गट असा त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे. झोले हेही राष्ट्रवादी, शिवसेना , भाजप असा प्रवास करून शिंदे गटात सामील झाले आहेत. अशी या तालुक्याची ओळख आहे. समर्थकांपेक्षा आपल्याला किंवा घरातच लाभाची पदे कशी मिळतील, असेच येथील नेत्यांनी पहिले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या नेत्यांकडून पक्षहित कितपत जोपासले जाईल हाही प्रश्नच आहे.
घरचेच बघायचे
सध्या खोसकर हे या तालुक्याचे विधानसभेत नेतृत्व करीत असले तरी ज्या पक्षाने त्यांना संधी दिली, ती काँग्रेस त्यांनी कितपत आत्मसात केली हा संशोधनाचा विषय आहे. काँग्रेसचे आमदार असतानाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना ते काडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप होत आहे. मर्जीतील चारचौघांना सोबत घेऊन ते कारभार हाकत असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर जबाबदारी टाकतील की नाही याविषयी साशंकता आहे. मेंगाळ शिंदे गटात असले तरी उमदेवार आपल्याच घरातील राहील, याचीच काळजी ते घेतील, जाणकारांचा अंदाज आहे. शिवसेनेच्या गावित यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारीही आपापल्या उमेवारीसाठी प्रयत्नशील राहतील. या तालुक्यात भाजप आणि मनसेला अद्यापही जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. म्हणजे ज्यांनी कोणी आमदारकी भोगली त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपलीच राजकीय सोय पहिली, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
जिल्हाध्यक्षपदासाठी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपाळराव गुळवे यांची चिरंजीव अॅड संदीप गुळवे हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. पिता अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले असताना त्यांचे पुत्र मात्र काँग्रेस सोडून राष्ट्रवादी, अन शिवसेनेच्या द्वाराशी पायधूळ झाडून आले आहेत. संदीप गुळवे आमदार खोसकर यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. जिल्हा परिषद, जिल्हा बँक या संस्थांवर सदस्यपद भूषविलेले संदीप गुळवे काँग्रेसचे जिल्हाध्यपद मिळविण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना खोसकर हेच पक्षाच्या महत्वाच्या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्ती असावी म्हणून गुळवे यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जाते. तसे झाल्यास आगामी जिल्हा परिषद निवणुकीत पक्षाची सूत्रे इगतपुरी तालुक्याकडे येतील. गुळवे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे गोरख बोडके हेही खोसकर यांचे निकटवर्तीय मानले जातात.
वेट अँड वॉच भूमिका
वरकरणी हे राजकीय चित्र दिसत असले तरी तालुक्याचा पक्षांतराचा इतिहास बघता ऐनवेळी चित्र बदलू शकते, असे मानले जाते. याशिवाय गटांचे आरक्षण नेमके काय राहणार यावरही सारे काही अवलंबून राहणार आहे. तूर्तास तरी इच्छुक वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत. तरीही कोणत्याही एका गटात मात्र लक्षवेधी लढत बघायला मिळू शकते ती म्हणजे गावित आणि मेंगाळ यांच्यात! कारण जो काही गट आरक्षित असेल तो या दोघांसाठीही एकमेव राहणार आहे. म्हणजे शिंदे गट विरोधात ठाकरे गट याठिकाणी उभे ठाकलेले दिसणार आहेत.
गेल्या पंचवार्षिक मधील जिल्हा परिषद सदस्य
सुशीला मेंगाळ – शिरसाठे गट (शिवसेना), नयना गावित -वडीवऱ्हे गट (काँग्रेस), जयंत जाधव – घोटी गट (राष्ट्रवादी), कावजी ठाकरे – नांदगाव सदो गट (शिवसेना), हरिदास लोहकरे- खेड गट (शिवसेना)
ZP Nashik Election Politics Igatpuri Taluka Trible Area