नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस सेवाकर्मी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाने अनुकंपा तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जेष्ठता यादीत प्रतिक्षेत असलेल्या १० वारसांचा गट क संवर्गातील विविध पदांवर समावेश करण्यात आला, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते या सर्व वारसांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
नियुक्ती आदेश वितरणावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत, आपण केवळ आपल्या पदापुरते मर्यादित न राहता समाजहित जपणाऱ्या वृत्तीने काम करावे, आपल्या दिवंगत पालकांनी ज्यांनी जिल्हा परिषदेत समसर्पक वृत्तीने सेवा केली त्यांचा आदर्श घेत त्यामुळे समाजसेवेची ही परंपरा जपणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी ते म्हणाले.
या नियुक्तींमध्ये सहाय्यक लिपिक २, वरिष्ठ सहायक लेखा १, कनिष्ठ सहायक लेखा १, औषध निर्माण अधिकारी १, शिक्षण सेवक २, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) १, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १ अशा पदांचा समावेश आहे.
अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र येवला, अनिल दराडे, वरिष्ठ सहाय्यक शितल शिंदे व सुनील थैल यांनी परिश्रम घेतले.