नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी देवळा तालुक्यातील विविध शासकीय आस्थापनांची पाहणी करून प्रशासकीय आणि शालेय कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी पंचायत समिती कार्यालय, शाळा, वसतिगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी केंद्रांना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांसोबत चर्चेद्वारे त्यांनी विकासकामे, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थापनासंदर्भात सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांसोबत भोजन आणि संवाद
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या देवळा विद्यानिकेतन शाळेतील वसतिगृहाला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मेसमध्ये भोजन घेतले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सुयोग्य आहार मिळतो का, त्याचबरोबर अभ्यासाविषयक माहिती घेतली. या दरम्यान स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार केला.
प्रशासकीय आढावा आणि स्वच्छतेबाबत सूचना
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी देवळा पंचायत समिती कार्यालयाची पाहणी केली. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत आढावा घेऊन मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवस कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या सूचना पंचायत समितीतील खातेप्रमुख व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना केल्या.
यानंतर, ग्रामपंचायत दहीवड, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी केंद्र रामनगर येथे स्वच्छतेच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान काही ठिकाणी गैरसोयी आढळून आल्या. स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रत्येक विभागाने स्वच्छता आणि कामकाजाच्या शिस्तीला प्राधान्य द्यावे, आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पालक अधिकारी तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे, गट विकास अधिकारी राजेश कदम, सहायक गट विकास अधिकारी भरत वेन्दे, गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया अहिरे यांच्यासह तालुका स्तरावरील अधिकारी, प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.