नाशिक : १४ व्या वित्त आयोगातील ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना मानवविकास निर्देशांक वृध्दीसाठी शिक्षण, आरोग्य व उपजिविका या संबंधित उपक्रमासाठी कमीत कमी २५ टक्के निधीची तरतूद करून खर्च करणे बंधनकारक असल्याचे शासनाने निर्देशित केलेले होते. नाशिक जिल्हा परिषद स्तरावर १४ व्या वित्त आयोगाचे ५ कोटी रुपये शासन स्तरावर कोविड प्रतिबंधक उपाय योजनेसाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करण्यास सुचविणेत आले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी न करता नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यास एक मुखाने मान्यता देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोर गरीब रुग्णांना रुग्णवाहिका खरेदी केल्याने तात्काळ अत्यावश्यक रुग्ण सेवा मिळण्यास मदत होईल अशी भूमिका सभागृहाने मांडली होती. नाशिक जिल्हा परिषद सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना प्रशासनास केल्या होत्या. यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संमत केलेला प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता._
यासंदर्भात शासन स्तरावर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मान्यता व निधी उपलब्धतेसाठी जि. प.चे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांना प्रत्यक्ष भेटून हा निधी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधेसाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, ग्रामविकास विभागाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी ३५ रुग्णवाहिका उखरेदी केल्या जाणार असून पुढील काळात जिल्ह्यातील कोरोना साथरोगासह इतर अत्यावश्यक तातडीच्या रुग्णांना सेवा उपलब्ध होणेस मदत होणार आहे.
.
३५ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार
जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ व्हावी असा आमचा नियमित प्रयत्न राहिला आहे, १४ व्या वित्त आयोगातील हा निधी मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. निधी उपलब्धते झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३५ रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जि. प. नाशिक_