नाशिक – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ODF+) कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ओडीएफ प्लस या विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
हागणदारीमुक्त अधिक (ODF+) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करुन लोकसहभाग वाढवणे हा या स्पर्धेचा उददेश आहे. सदर स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा व राज्य पातळीवर गौरविण्यात येणार आहे. घोषवाक्य स्पर्धेत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीं व सर्व महसुली गावांनी सहभाग घ्यावयाचा आहे. घोषवाक्य हे शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण इ. विषयावर लिहिता येणार आहेत. घोषवाक्य गावातील सार्वजनिक जागा, सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफीस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती इ. ठिकाणी दर्शनी भागात रंगविता येणार आहे. घोषवाक्य सहा फुट बाय चार फुट अशा आकारात असावीत. गावातील घोषवाक्यात सांस्कृतिकदृष्टया तसेच तांत्रिकदृष्टया योग्य, सर्वसमावेशक आणि आकर्षक मजकुर असावा तसेच वाक्य ही लोकजागृती करणारी व परिणामकारक असावित.
सर्व ग्रामपंचायती व महसुल गावांना १५ सप्टेंबर या कालावधीत मध्ये घोषवाक्य रंगविण्याच्या सुचना देण्यात आल्या असून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी) दिपक चाटे यांनी केले आहे.