नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान इमारत व दळणवळण विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, वास्तुविशारद तसेच संबंधित बांधकाम ठेकेदार उपस्थित होते.
नवीन इमारतीच्या बांधकाम पाहणी प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी इमारतीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी पहिल्या तीन मजल्यांचे फर्निचरचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, इमारतीच्या बाहेरील रस्ते आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांना देखील गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नवीन इमारत पर्यावरणपूरक व्हावी यासाठी इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (IGBC) मानकांनुसार इमारतीचे काम पूर्ण करून त्याची IGBC मध्ये नोंदणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यासोबतच, नवीन प्रशासकीय इमारतीतील प्रशस्त सभागृहाच्या ध्वनीव्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली. सभागृहात आवाज घुमू नये यासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम आणि साहित्य वापरावे याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभागृहातील ध्वनीव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या प्रत्येक आठवड्यात जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेत असून यामुळे कामाच्या गुणवत्तेवर तसेच काम पूर्ण होण्याच्या वेळापत्रकावर अधिक भर देऊन ते वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.