नाशिक: विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज जिल्हा परिषदेत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध योजनांबाबत व उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करुन जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या रंगीत बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्ररथ व व्हिडीओ स्पॉटचे त्यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात आज विविध विषयांबाबत सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकारी यांची आढावा कार्यशाळा विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सर्वप्रथम माझी वसुंधरा अभियानाचा आढावा घेण्यात आला यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) दिपक चाटे यांनी जिल्हयात सुरु असलेल्या विविध उपक्रमांबाबत सादरीकरण करीत माहिती दिली. माझी वसुंधरा अभियानात नाशिक जिल्हयात चांगले काम झाले असून अंतिम टप्यात सर्व यंत्रणेच्या समन्वयाने प्रभावीपणे काम करण्याचे व प्रत्येक खातेप्रमुखाला एका ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. स्वयंमुल्यांकनात कमी गुण असलेल्या ग्रामपंचायतींचा यावेळी आढावा घेण्यात आला.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत कार्यकारी अभियंता पुरूषोत्तम भांडेकर यांनी सादरीकरण केले. जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी, सुरु असलेल्या योजना, खर्च याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्तांनी सौर कृषी पंपाव्दारे पाणी पुरवठा करणेबाबत सुचना केल्या. आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, जॉबकार्ड मॅपिंग, उमेद अभियान याबाबत आढावा घेण्यात आला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके यांनी याबाबत माहिती देताना उमेद अभियानांतर्गत सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण कामांबाबत सादरीकरण केले.
बालविकास विभागांतर्गत अमृत आहार योजना, कुपोषित बालक, अंगणवाडी भरती प्रकिया आदि विषयांबाबत आढावा घेण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) दिपक चाटे व आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सादरीकरण केले. एक मुठ पोषण अभियानाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. आरोग्य विभागांतर्गत बालमृत्यु, मातामृत्यु, जोखमीच्या मातांचे सनियंत्रण आदि विषयांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सर्व प्राथमिक केंद्रामध्ये बायोमॅट्रिक हजेरी सुरु करण्याच्या सुचना यावेळी विभागीय आयुक्तांनी दिल्या. जिल्हा परिषदेने १० टक्के तीव्र जोखमीच्या मांतांसाठी सुरु केलेल्या ॲनामॉली स्कॅन या नाविन्यपूर्ण् उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत १० टक्के तीव्र जोखमीच्या मांतांसाठी ग्रामनिधी, १५ वा वित्त आयोग, पेसा यामधून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
गेल्या दोन वर्षात आस्थापनाविषयक केलेल्या कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सादरीकरण केले, यामध्ये अनुकंपा प्रकरणे, पदोन्नती प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे, आश्वासीत प्रगती योजना, स्थायित्व प्रमाणपत्र, सेवा ज्येष्ठा याद्या अंतिम करणे आदि विषयांबाबत माहिती देण्यात आली. वित्त विभाग, महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विषयांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांचा कालावधी पुर्ण झाल्याबददल जिल्हा परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस उपायुक्त (विकास) ज्ञानेश्वर शिंदे, सहाय्यक आयुक्त सोनिया नाकाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बोधचिन्ह व संकेतस्थळाचे अनावरण
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या रंगीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अद्यावत संकेतस्थळाचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे संपादित व स्विय सहायक जी.पी.खैरनार संकलित ‘ग्रामविकासाची शाळा’ पुस्तकाचे प्रकाशन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचत गटांच्या महिलांकडील उत्पादन विक्रीसाठी तयार केलेल्या पोर्टलचेही यावेळी अनावरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी तयार केलेल्या एल.ई.डी चित्ररथांचे व जनजागृतीपर जिंगल्स व व्हिडीओ स्पॉटचे उदघाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले.