मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्राणी आणि पक्ष्यांमधून माणसांमध्ये आजार पसरण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. विज्ञानाच्या भाषेत त्याला झुनोटिक आजार असे म्हणतात. जगभरात झुनोटिक आजारांमुळे आतापर्यंत एकूण सात कोटी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरण आणि जंगली प्राणी, पक्ष्यांचा जीव वाचवला नाही तर माणसांना कोरोनासारख्या धोकादायक आजारांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. झिका विषाणू, इबोला आणि कोरोना विषाणूमुळे लाखो नागरिकांचा दर वर्षी मृत्यू होत आहे. कोविड महामारीनंतर भविष्यात अशा प्रकारच्या महामारींविरोधात कसा सामना करावा, या गोष्टीवर संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली आहे.
त्यातच वैज्ञानिकांच्या एका समुहाने सल्ला दिला आहे की, महामारीचा फैलाव झाल्यानंतर त्याच्याशी सामना करण्याऐवजी त्यांना रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणे खूपच फायदेशीर पाऊल ठरणार आहे. www.science.org या संकेतस्थळावर छापलेल्या एका अहवालात वैज्ञानिकांनी असे तीन उपाय सांगितले आहेत ज्याने आगामी काळात महामारी रोखण्यासाठी मदत मिळू शकणार आहे. अनेक संशोधन झाल्यानंतर असे निष्पन्न झाले आहे की, जनावरांमधून माणसांमध्ये विषाणूचा फैलाव होणे हाच महामारीच्या जोखमेचा मुख्य स्त्रोत आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, कोरोना विषाणूने फैलाव झालेल्या महामारीची सुरुवात वटवाघुळामध्ये आढळणाऱ्या विषाणूने झाली. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर निदान, उपचार आणि त्वरित लसीकरणासाठी तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक करण्याच्या आवश्यकतेवर या अहवालात भर देण्यात आला आहे.
या आजारामुळे १९१८ मध्ये ५ कोटींहून अधिक नागरिकांचा जीव गेला होता. अशाचप्रकारे एच२एन२ एन्फ्लुएंजाने ११ लाख, लासा तापामुळे २.५ लाख, एड्स १.०७ कोटी, एच१एन१ मुळे २.८ लाख आणि कोरोना विषाणू ४० लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षांमध्ये प्राण्यांपासून निर्माण होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. इबोला, बर्ड फ्लू आणि सार्ससारखे आजार याच श्रेणीत येतात. असे आजार वाढण्यास माणूसच कारणीभूत असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, जंगली प्राण्यांना पकडण्यामुळे आणि त्यांच्या व्यापारामुळे आजारांचा फैलाव होण्याची जोखीम वाढते. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या व्यापारावर प्रतिबंध घालण्याची गरज आहे. नुकतेच चीनने यावर पाऊल उचलले आहे. तसेच उष्णकटिबंधीय वनांची कत्तल कमी करणे विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी आवश्यक आहे. वन्य प्राण्यांच्या पशु चिकित्सा क्षमता वाढवण्याचीसुद्धा गरज आहे.