हरारे (झिम्बाब्वे) – देशातील राजकारण आणि आर्थिक डबघाईमुळे झिम्बाब्वे क्रिकेट लयास गेले आहे. एकेकाळी संघात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू असणार्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या खेळाडूंची दुर्दशा निदर्शनास आली आहे. झिम्बाब्वेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंकडे चांगले बूट नसल्याचे उघड झाले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी फलंदाज रेयान बर्ल याने फाटलेल्या बुटाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्रीय संघाला प्रायोजकत्व मिळावे, अशी मागणी केली आहे. क्रिकेट संघाला प्रायोजकत्व मिळेल अथवा नाही. परंतु बिर्लच्या मदतीसाठी एका स्पोर्ट्स कंपनीने पुढाकार घेतला आहे.
‘आम्हाला कोणी प्रायोजक लाभेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला बूट चिकटवण्यास लागू नये”, असे ट्विट बर्लने केले. बर्लच्या मदतीसाठी प्यूमा क्रिकेट कंपनी समोर आली आहे. “आता डिंक बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. कारण आम्ही तुमच्या मदतीसाठी येत आहोत”, असे प्यूमाने ट्विटच्या प्रत्युत्तरात म्हटले आहे. बर्ल याने आपल्या बुटांसह डिंक आणि काही उपकरणांचा फोटो शेअर केला होता.
२७ वर्षीय डावखुरा मध्यम क्रमातील फलंदाज बर्ल याने तीन कसोटी, १८ एकदिवसीय आणि २५ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. झिम्बाब्वेला १९८३ विश्वचषकापूर्वी वनडेचा दर्जा आणि १९९२ रोजी कसोटी सामन्यांसाठीचा दर्जा देण्यात आला होता. झिम्बाब्वेचा संघ गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी संघर्ष करत आहे.
देशाचे प्रतिनिधित्व करणारे फ्लावर बंधू अँडी आणि ग्रांट फ्लावर, अॅलिस्टेर कॅम्प्बेल, डेव्ह ह्यूटन, हीथ स्ट्रीक आणि नील जॉन्सनसारखे क्रिकेटपटू पुन्हा येऊ शकले नाहीत. आयसीसीने २०१९ मध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाला निलंबित केले होते. त्यानंतर संघाला खेळण्याची परवानगी देण्यात आली. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने नुकताच झिम्बाब्वे दौरा करून कसोटी मालिका जिंकली. तसेच टी-२० क्रिकेट मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती.
https://twitter.com/ryanburl3/status/1396137203894468609