मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला आहे. मात्र काही ठिकाणी वर्ग खोल्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यापक बैठक बोलावली जाईल. वर्ग खोल्यांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत आणि खोल्यांच्या बांधकामाबाबत धोरण ठरविण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाईल.
अहमदनगर जिल्ह्यातील शाळांच्या खोल्या बांधण्यासाठी शिर्डी संस्थानने निधी दिला होता. मात्र त्यासाठी मंजुरी आणि वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करायचे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाडा विभागातील जुन्या शाळांच्या पुनर्बांधणी निधी उपलब्ध करून दिला जाईल, राज्य शासनाच्या माध्यमातून विकास तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील शाळांचे निसर्ग वादळाने नुकसान झाले आहे. त्याबाबतही एक बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Zilha Parishad School Classroom Construction Minister Says
Rural Development Minister Girish Mahajan
Monsoon Assembly Session