मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भरती प्रक्रिया थंडावलेली आहे. अशात सरकारने कुठल्याही भरती प्रक्रियेची जाहिरात काढल्यास त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात दिसून येत आहे. असाच एक प्रकार झेडपीतील जागा भरती प्रक्रियेदरम्यान दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, १९ हजार जागांसाठी तब्बल १४.५१ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार आहे. त्यासाठी तब्बल १४ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. उमेदवारांच्या अर्जातून सरकारच्या तिजोरीत १४५ कोटी रुपये जमा झाले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. अर्जांची छाननी होऊन परीक्षा पार पडतील. उमेदवारांची संख्या पाहता एक-दोन दिवसात परीक्षा पार पाडणे अशक्य असल्याने किमान आठ दिवसांत वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमदेवारांची परीक्षा घेतली जाणार आहे.
एकच उमेदवार करतो जागोजागी अर्ज
राज्यात सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याची वस्तुस्थिती तलाठी भरतीनंतर आता जिल्हा परिषदांच्या भरतीत देखील समोर आली आहे. एका ठिकाणी अपयश आल्यानंतर तोच उमेदवार पुन्हा दुसऱ्या पदासाठी अर्ज करतोय, असे चित्र आहे. त्यामुळे एका उमेदवाराला आठ ते दहा हजार रुपयांचे नुसते अर्जाचे शुल्कच भरावे लागणार आहे.
Zilha Parishad Recruitment Applications Job Vacancy
Unemployment Rural Development