नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील गुणवत्ताक्रमानुसार यापूर्वी दि.८ ऑक्टोबर दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशान्वये एकूण ५५९ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती. सदर आदेशानुसार नियुक्ती दिल्यानंतर शाळांवर जे उमेदवार हजर झाले नाहीत अशा उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येऊन या उमेदवारांच्या जागी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने २३७ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
सदर नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यामुळे जिल्हयातील आदिवासी दुर्गम भागातील शाळांना शिक्षक मिळणार आहेत. यामध्ये भाषा विषय समूह, गणित व विज्ञान, समाजशस्त्र विषय समूह व १ली ते ५वी सर्व विषयांच्या शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन सदर शिक्षकांच्या नियुक्ती कामी गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणी केली होती त्यानुषंगाने डॉ. बच्छाव व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज व सर्व पंचायत समित्यांचे गट शिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने सदर आदेश आज निर्गमित करण्यात आले. यासंदर्भात सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, अनिल गीते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अर्जुन निकम, अनिल दराडे वरिष्ठ सहाय्यक नीलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
तालुका निहाय नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचा तपशील खालील प्रमाणे :
1) बागलाण -२२
2) देवळा-२
3) कळवण -१६
4) सुरगाणा -८७
5) दिंडोरी-३६
6) पेठ-२४
7) त्र्यंबकेश्वर -२९
8) इगतपुरी -२१