नवी दिल्ली – देशात कोरोनाचे संकट दूर होत नाही तोच आता झिका विषाणूचाही प्रादुर्भाव सुरू झाला आहे. भारतात प्रथमच केरळमध्ये झिका विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळले आहेत. त्याची तत्काळ दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही घेतली आहे.
केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, आता नवीन तीन रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये दोन वर्षांचा एक मुलगा, ४६ वर्षीय व्यक्ती आणि २९ वर्षीय आरोग्य कर्मचार्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १८ बाधित आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
राज्य सरकारने तिरुअनंतपुरम, त्रिशूर आणि कोझिकोड वैद्यकीय रुग्णालये आणि अलाप्पुझामधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) मध्ये तपासणीची व्यवस्था केली आहे. दोन गटात २७ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी २६ अहवाल निगेटिव्ह आले. आठ नमुन्यांच्या तिसर्या गटात रविवारी तीन बाधित असल्याचा अहवाल आला आहे, असे वीणा जॉर्ज यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, पुण्याच्या एनआयव्हीमधून २१०० तपासणी किट मिळाले आहेत. त्यापैकी तिरुअनंतपुरमला एक हजार, अलाप्पुझा येथे ५०० आणि त्रिशूर आणि कोझिकोड येथे प्रत्येकी ३०० किट दिले आहेत.
तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाला ५०० ट्रिपलएक्स किट मिळाले आहेत. या किटद्वारे डेंगी, चिकुनगुनिया आणि झिका विषाणूच्या आरएनएचे एकत्रित निदान केले जाऊ शकते. तसेच ५०० सिंगलप्लेक्स किटद्वारे फक्त झिका विषाणूचे निदान केले जाऊ शकते. झिका विषाणूने बाधित झाल्याचा संशय असलेल्या लोकांचे नमुने गोळा करण्याच्या सूचना पुण्याच्या एनआयव्हीने केरळ सरकारला केल्या आहेत.
राज्यात झिका विषाणूच्या तपासणीच्या सुविधा वाढविण्यासह आणखी प्रयोगशाळा दिल्या जाणार आहेत. राज्यात आरटीपीसीआरची चाचणी करू शकणार्या २७ सरकारी प्रयोगशाळा आहेत. अधिक चाचणी किट राज्यात पोहोचताच एनआयव्हीच्या परवानगीने या प्रयोगशाळांमध्ये झिका विषाणूच्या चाचण्या केल्या जातील. गर्भवतींना ताप, शरीरावर चट्टे आणि अंगदुखीसारखे लक्षणे असल्यास त्यांची त्वरित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, असे आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी सांगितले.