नवी दिल्ली – महाराष्ट्रात झिका विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरच्या परिस्थितीचे परीक्षण करण्यासाठी आणि झिका बाधित रुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बहुआयामी पथक महाराष्ट्राकरिता रवाना केले आहे. पुणे जिल्ह्यात नुकताच झिका विषाणूग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. केंद्राने पाठविलेल्या तीन सदस्यांच्या पथकात पुण्याच्या प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीच्या लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ञ आणि नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेतील कीटकतज्ञ यांचा समावेश आहे. हे पथक राज्य आरोग्य विभागासोबत समन्वयाने काम करून रुग्ण सापडलेल्या ठिकाणाची परिस्थिती समजून घेईल आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या झिका व्यवस्थापनासाठीच्या कृती योजनेची अंमलबजावणी आवश्यक आहे का याचे मूल्यमापन करून राज्यातील झिका विषाणू व्यवस्थापनासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप करण्यासाठी सूचना देईल.