नवी दिल्ली – भारतीय स्टेट बँकेने झिरो बॅलेन्स असलेल्या गरिब खातेधारकांकडून विविध सेवांच्या नावाखाली मनमानी पद्धतीने शुल्क लागू केले आहेत. बेसिक सेव्हिंग्ज डिपॉझिट अकाउंटधारकांकडून (बीएसबीडीए) चारहून अधिक वेळा पैसे काढल्यास प्रत्येक वेळी १७.७० रुपये शुल्क घेण्याचा निर्णय एसबीआयने घेतला होता. त्याअंतर्गत एसबीआयने २०१५ पासून २०२० पर्यंत १२ कोटी खातेधारकांकडून जवळपास ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती मुंबई आयआयटीने केलेल्या सर्वेक्षणाच्या धारावर दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन
भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक पीएनबीने याच काळात ३.९ कोटी गरिब खातेधारकांकडून ९.९ कोटी रुपये वसूल केले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारातून तसेच एटीएममधून महिन्यातून चारपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यावर १७.७० रुपयांचे शुल्क वसूल करणे, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे सुनियोजित उल्लंघन असल्याचे, आयआयटीचे प्राध्यापक आशिष दास यांनी सांगितले. विशेष म्हणजे झीरो बॅलेन्स असलेले सर्वात जास्त गरिब खातेधारक एसबीआयचेच आहेत. त्यांच्याकडून विविध सेवा शुल्काच्या नावावर वसुली करणे अनुचित आहे.
पैसे काढण्याची सवलत
झीरो बॅलेन्स असेलल्या खातेधारकांना एका महिन्यात चारहून अधिक वेळा पैसे काढण्याची परवानगी आहे, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०१३ मध्ये दिले होते. अशा आर्थिक व्यवहारांवर बँक शुल्क लावू शकत नाही. बेसिक खातेधारकांची संज्ञा स्पष्ट करताना आरबीयने स्पष्ट केले होते की, अनिवार्य मोफत बँकिंग सेवेशिवाय जोपर्यंत खाते बीएसबीडीए असेल, तोपर्यंत त्यांच्याकडून अतिरिक्त कोणतेही शुल्क अदा करू शकत नाही.
ग्राहकांचे खच्चीकरण
एसबीआयने पतंप्रधान जनधन योजनेची उपेक्षा करताना बीएसबीडीए खातेधारकांकडून रोजच्या डिजिटल व्यवहारांवरही मोठे शुल्क वसूल केल्याचे अभ्यासात म्हटले आहे. देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना एसबीआयकडून होत असलेल्या शुल्कवसुलीमुळे अशा ग्राहकांचे खच्चीकरण होत असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
आयडीबीआयची बंदी
आयडीबीआयच्या संचालक मंडळाने १ जानेवारी २०२१ पासून यूपीआय, भीम, आयएमपीए, एनईएफटी आणि डेबिट कार्ड वापरताना प्रत्येक व्यवहारावर २० रुपये शुल्क लावण्यास मंजुरी दिली होती. एटीएममधून रोख पैसे काढण्यासाठी ४० रुपये आणि एका महिन्यात १० हून अधिक वेळा पैसे काढल्यास ही सेवा बंद करण्याची अट घातली होती.