इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – मध्यंतरीच्या काळात ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांचे प्रमाण वाढले. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला. असे असले तरीही या मालिकांचा ठरावीक प्रेक्षक आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत या मालिका मागे पडतात. ‘श्यामची आई’ या मालिकेला असाच फटका बसला, आणि त्याची वेळ बदलण्यात आली. आता आणखी एका ऐतिहासिक मालिकेला टीआरपीचा फटका बसला आहे. टीआरपी अभावी ही मालिका लवकरच बंद होणार आहे. ही मालिका कधी बंद होईल आणि त्या जागी कोणता नवीन कार्यक्रम सुरू होईल हे अजून समोर आलेलं नाही. परंतु ही ऐतिहासिक मालिका बंद होणार असल्याने सोशल मीडियावरून या मालिकेचे प्रेक्षक त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’, असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या लोकमान्य टिळक यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘लोकमान्य’ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. याआधीही टीआरपी नसल्याचं कारण देत अनेक मालिका बंद करण्यात आल्या होत्या. तीच वेळ आता ‘लोकमान्य’ या मालिकेवरही आली आहे. त्यामुळे ‘इथून पुढे भागांच्या संख्यांचा करार करू’ असे निर्माते नितीन वैद्य म्हणाले.
‘लोकमान्य’ या मालिकेतून लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा मांडण्यात येते आहे. या मालिकेच्या निमित्तानं टिळकांचा प्रभावी इतिहास प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेली ‘लोकमान्य’ ही दुसरी अशी मालिका आहे जिचा प्रवास काहीसा वेळेआधी संपतोय. ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील मालिकांच्या भागांची संख्या निश्चित असेल तरच आम्ही अशा प्रकारच्या मालिका करण्याचा विचार करू. तसंच ठरलेल्या भागांचा करार करू’ असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. याआधी याच निर्मिती संस्थेच्या ‘सावित्रीजोती’ या मालिकेबद्दलही असंच घडलं होतं, असे मालिकेच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. या सगळ्यासाठी मालिका प्रक्षेपित होणारी वेळदेखील अनेकदा काही अंशी कारणीभूत असण्याची शक्यता असते.
मालिकेसाठी प्रेक्षकांचं मिळणारं पाठबळ रेटिंगमधून मोजलं जातं. त्याच्या आधारावर विशिष्ट मालिकेच्या वेळेतील जाहिरातींचं उत्पन्न मिळतं. ज्या मालिकेला रेटिंग मिळत नाही, त्या मालिका बंद होतात. आता याचाच फटका ‘लोकमान्य’ मालिकेला बसतो आहे. सध्या ही ‘लोकमान्य’ ही मालिका बुधवार ते शनिवार रात्री दाखवली जाते. ही मालिका सुरू झाली तेव्हा या मालिकेचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. वेगळ्या विषयावरील मालिका घेऊन आल्याबद्दल प्रेक्षकांनी वाहिनी आणि निर्मात्यांचंही कौतुक केलं. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले. या मालिकेतील कलाकार सेटवर घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडिया वरून चाहत्यांशी शेअर करत असतात. पण आता टीआरपीच्या अभावी झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.