नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना विधानसभेत आलटूनपालटून संधी देणाऱ्या सिन्नर तालुक्याने गेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत शिवसेनेला साथ दिली. या तालुक्यात कोकाटे व वाजे भोवती राजकारण फिरत असल्यामुळे या निवडणुकीत पक्षीय राजकारण तसे कमीच आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडीमुळे या तालुक्यात नेत्यांची मात्र अडचण झाली असून येथील मतदारही संभ्रमात आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस व ठाकरे गटाची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. या आघाडीतच हे दोन्ही नेते आहेत. त्यामुळे येथील निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवली जाते की स्वतंत्र हा येथील कळीचा मुद्दा आहे.
सगळ्याच पक्षांचा अनुभव घेऊन आलेले कोकाटे सध्या राष्ट्रवादीत आहेत. तर वाजे यांच्या खांद्यावर सेनेच्या ठाकरे गटाचा झेंडा आहे. कोकाटे विकासकामांच्या बाबतीत ख्यातनाम आहेत तर वाजे मितभाषी अन दांडगा जनसंपर्क असलेले नेते मानले जातात. जिल्हा परिषदेचे पाच गट या तालुक्यात आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पाचपैकी तब्बल चार गट शिवसेनेच्या ताब्यात होते. एका गटात कोकाटे कन्या सीमंतिनी भाजपचा सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांची लढत सुध्दा अटीतटीची होती.
यापूर्वी कोकाटे समर्थक दिलीप शिंदे, राजेंद्र चव्हाणके, राजेश नवाळे, बाळासाहेब वाघ हे सारेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यावेळी कोकाटे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या या समर्थकांच्या रूपाने काँग्रेसचे अस्तित्व जिल्हा परिषदेत दिसून आले होते. कोकाटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर या पक्षाचे अस्तित्वही संपुष्टात आले, हा इतिहास आहे. आमदार होण्याची इच्छा बाळगून असलेले वाघ सध्या कोकाटे यांच्यापासून दुरावले आहे. निलेश केदार, उदय सांगळे यासारखे शिलेदार वाजे यांच्याकडे आहे. सांगळे यांच्या सौभाग्यवती शीतल सांगळे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे, हे विशेष ! हा झाला इतिहास. यापुढे काळात नेमके काय चित्र असेल याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे.
आमदार कोकाटे ज्या पक्षात आहे ती राष्ट्रवादी असो कि वाजे यांच्या ठाकरे गटाची शिवसेना महाविकास आघाडीच्या बंधनात अडकली आहे. पुढील निवडणुकांमध्येही ही आघाडी कायम राहणार असल्याचे वक्तव्य राज्यपातळीवरील नेते करीत आहेत. असे झाल्यास कोकाटे आणि वाजे यांचे काय, त्यांच्यात मैत्रीचा पूल बांधला जाणार का, हा खरा प्रश्न आहे. भाजपचे या तालुक्यात अस्तित्व नाही. तो भाग अलाहिदा. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर त्या पक्षाचीही स्थिती फारशी वेगळी नाही. पण हा पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे. मग कोणत्या गटात कोणी लढायचे असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण गेल्यावेळी चार गट शिवसेनेकडे होते तर कोकाटे यांच्याकडे एक गट होता. आपल्या चार गटांवरील दावा शिवसेनेचे वाजे सोडण्याविषयी साशंकता आहे. दुसरीकडे कोकाटे विद्यमान आमदार असल्याने त्यांचे समर्थक तर सगळ्याच गटात राहणार आहेत. तेव्हा आपल्या समर्थकांच्या भावनांना मुरड कोकाटे यांना शक्य होणार आहे का, हाही प्रश्नच आहे.
शिंदे गटाचेही उमेदवार
हेमंत गोडसे यांना खासदार करण्यासाठी सिन्नर तालुक्याने मोलाची साथ दिली आहे. किंबहूना बाळासाहेब वाघ यांच्यासारख्या परपक्षातील पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध आहे आहेत. हेच गोडसे सध्या शिंदे गटात आहेत. तालुक्याने मोलाची साथ दिल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार उतरविणे अन ते निवडून आणण्यासाठी प्रयत्नही करणे, हे ओघाने आलेच. त्यामुळे या तालुक्यातील निवडणूक रंजक होईल, असे भाकीत वर्तविले जात आहे.
यांनी भूषविले सदस्यपद
निलेश केदार – नांदूरशिंगोटे गट (शिवसेना) *वनिता शिंदे – ठाणगाव गट (शिवसेना) * शीतल सांगळे – चास गट (शिवसेना) * सीमंतिनी कोकाटे – देवपूर गट (भाजप ) * वैशाली खुळे-मुसळगाव गट (शिवसेना) *सुनीता सानप- नायगाव गट (शिवसेना)